सिंधुदुर्गसह सहाही जिल्ह्यांतून भविष्यात उत्कृष्ट न्यायमूर्ती व सीनियर वकील घडतील – न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांचा विश्वास
कुडाळ :
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर आज हा अतिशय सुंदर सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सर्किट बेंचचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नवीन वकील येत असतात. सिंधुदुर्गसह सहाही जिल्ह्यातील वकिलांचे काम चांगले आहे. त्यामुळे निश्चितच या सहाही जिल्ह्यातून बरेच न्यायमूर्ती आणि सीनियर असे चांगले वकील हायकोर्टात येतील, असा विश्वास कोल्हापूर सर्किट बेंचचे प्रशासकीय न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी आपला वकील ते न्यायाधीश पर्यंतचा प्रवास उलगडला. वकिलांनी इथिक्स आणि पेशन्स ठेवून जबाबदारीने काम केले पाहिजे, असेही ते म्हणाले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदी निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्गचे भूमिपुत्र असलेले न्यायमूर्ती श्रीराम शिरसाट व न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांचा सत्कार सोहळा आणि जिल्ह्यातील वकिलांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानमालेचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेच्या वतीने रविवारी पावशी येथील शांतादुर्गा हॉलमध्ये करण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर सर्किट बेंचचे प्रशासकीय न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आशीष चव्हाण, न्यायमूर्ती अमित जामसंडेकर, न्यायमूर्ती श्रीराम शिरसाट, जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधीर देशपांडे, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी अध्यक्ष ॲड. संग्राम देसाई व जिल्हा वकील संघटना अध्यक्ष ॲड. परिमल नाईक आदी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला जिल्ह्यातील न्यायिक अधिकारी व वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी न्यायमूर्तींचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन बार असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.
न्यायमूर्ती चव्हाण म्हणाले, ट्रायल कोर्ट ते हायकोर्ट हा प्रवास वकिलांना करावा लागतो. यावेळी युक्तिवाद करताना पद्धतशीरपणे मांडणी करावी लागते. हायकोर्टात प्रॅक्टिस करताना वकिलांनी परिषद लक्षात घेऊन अगदी कायद्याचा परिपूर्ण अभ्यास करून केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. न्यायमूर्ती श्री. जामसंडेकर यांनी म्हटले, कोल्हापूरला सुरू झालेले सर्किट बेंच हे तुमच्यासाठी फार मोठी जबाबदारी आहे. वकील पेशात असताना तो समाजातील इतरांपेक्षाही वेगळा असतो. वकील समाजाचे प्रतिनिधित्व करतो. कामाचा अनुभव घेत असताना मोठी शक्ती व अस्त्र आपल्या हातात असते ते म्हणजे नैतिकता. म्हणून इथिक्स महत्त्वाचे आहे. त्यानुसार काम कराल तेव्हा खूप काही साध्य होते. त्यामुळे सर्वांनी नैतिकता समोर ठेवून काम केले पाहिजे. वकिलांनी प्रॅक्टिस भरपूर केली पाहिजे. आत्मचरित्रे वाचली पाहिजेत. आपल्यात व्यक्तिमत्त्व विकास केला पाहिजे. कोल्हापूरला सर्किट बेंच झाल्याने जिल्ह्यातील नवीन वकिलांना हायकोर्ट पर्यंत जाण्यासाठी ही मोठी संधी निर्माण झाली आहे, त्यासाठी सर्वांनी भरपूर प्रॅक्टिस करावी असे आवाहन त्यांनी केले.
ॲड. देसाई म्हणाले, देशाचे तत्कालीन सरन्यायाधीश भूषण गवई जेव्हा जिल्ह्यात आले तेव्हा आपण त्यांच्यासमोर कोल्हापूरला सर्किट बेंचची मागणी बोलून दाखवली. त्यानंतर त्यांनी त्यासाठी पुढाकार घेत आज मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात सुरू झाले आहे. सिंधुदुर्गसह लगतच्या सहा जिल्ह्यांना याचा मोठा फायदा झाला आहे. सिंधुदुर्गातील वकिलांची नवीन पिढी या ठिकाणी जाऊन प्रॅक्टिस करीत आहे, हे निश्चितच अभिमानास्पद आहे. स्वागत व प्रास्ताविक ॲड. संग्राम देसाई, सूत्रसंचालन ॲड. विलास परब यांनी केले तर आभार ॲड. परिमल नाईक यांनी मानले.
