You are currently viewing शोधू कुठे तुला?
Oplus_16908288

शोधू कुठे तुला?

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा आदर्श शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम लेख*

 

*शोधू कुठे तुला?* 

 

 

सुख देवाशी मागावे, दुःख देवाला सांगावे

असे गाणे मी ऐकले आहे, सुखी माणसाचा सदरा कुठे सापडला नाही . एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे

हे तर अगदी खरे आहे.

सुख सुख म्हणजे काय? सुखी माणसाचा सदरा शिवण्याचा कपडा आणि शिंपी अजुन कोणाला सापडला नाही. कारण सुख ही एक कल्पना आहे, आणि ती प्रत्यक्षात उतरणे कर्म कठीण आहे. कारण पूर्णपणे सुखी, समाधानी असा माणूसच सापडत नाही. माणसाच्या मनात असंख्य विचारांचे कल्पनांचे जाळे विणलेले असते. म्हणजे त्याच्या सुखाच्या कल्पनाच भौतिकते भोवती गुंडाळलेल्या असतात. त्यामुळे त्याची सुखाची व्याख्याच संपत नाही, आणि मग त्याला सुखाचा शोध लागत नाही. सर्व सामान्य माणूस हा भौतिकतेला जास्त प्राधान्य देतो, त्याच्या भौतिक सुखाच्या अपेक्षा वाढत जातात

आणि तो कधीच सुखी होऊ शकत नाही.

 

सुख म्हणजे काय? तर सुख म्हणजे आत्मिक समाधान. सुखाची व्याख्या ही पैशात, वस्तूत किंवा जडजवाहिऱ्यात कधीच होऊ शकत नाही. याची मी अनेक उदाहरणे पाहिली आहेत, अशा व्यक्ती ही पाहिल्या आहेत की, त्यांचे समाधान कशानेही होत नाही, हे हवे अजून ते हवे अशी ही त्यांची हाव वाढतच जाते, आयुष्य संपत येते तरी त्यांना कुठेही थांबावेसे वाटतच नाही.

 

मला नेहमी आठवण येते आमच्या आईची. तिने मात्र आम्हाला अशीच शिकवण दिली होती की, आजपर्यंत मला तरी असे वाटत नाही की, जे दुसऱ्यांना मिळाले आहे त्या सर्व गोष्टी मला मिळाल्या पाहिजेत. कारण पैशाच्या अति श्रीमंतीत लोळलो नाही तरी, काहीच कमी पडले नाही, जगण्यासाठी जे जे आवश्यक होते ते सारेच मिळाले, पैसा पैसा करत पैशाच्या मागे धावलो नाही. योग्य मार्गाने जेवढा पैसा मिळाला तो सर्व साधारणपणे जगण्यासाठी पुरेसा होता. पैशाची हाव मनात न धरल्यामुळे तसे फारसे काहीच अडले नाही. वेळोवेळी योग्य कारणांसाठी हवा तेवढा पैसा मिळत गेला म्हणजे अगदीच काही कमी पडले नाही. त्यातच सुख मानत राहिलो. पण त्याचा अर्थ असा नाही की, अगदी कंजुषीने जगलो नाही की उधळ माधळ करीत राहिलो नाही. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली की, पैसा आज आहे उद्याची काही शाश्वती देऊ शकत नाही. पण जमेल तेवढे

ज्ञान गोळा करण्याचा प्रयत्न केला, करत आहे अगदी आयुष्याच्या अंतापर्यंत ज्ञानाचा शोध आणि ज्ञानदानाची क्रिया चालूच राहणार आहे.

आमच्या आईवडिलांनी सतत आम्हाला माया, प्रेम, वात्सल्य इतके दिले की, कधी असा विचार च मनाला शिवला नाही की, आपल्याकडे भरपूर पैसा असावा आणि आपणही दिमाखात पैशाची उधळण करीत लोकांना मोठेपणा दाखवावा. कारण एक आत्मिक समाधान हेच आमचे सुख होते, हीच आमची सुखाची व्याख्या होती. आमच्या घरी सतत पाहुणे, नातेवाईक, ओळखीची माणसे यांची ये – जा तर असायचीच

पण देवळात येणाऱ्या आईच्या मैत्रिणी, भजन मंडळ, किंवा आई-वडिलांच्या ओळखीचे सद्गृहस्थ हे सुद्धा येत असायचे. आणि विशेष म्हणजे गजानन बाबांच्या देवळातील

पुजारी ज्यांना बाबांचा साक्षात्कार झाला होता असे दादामहाराज सुद्धा आमच्या घरी यायचे हे विशेष. कोणत्याही शुभकार्यात आई, वडिल त्यांचा आशीर्वाद घ्यायचे, त्यांचे कृपाप्रसाद आमच्या घरावर असायचे. आता आई, वडिल , दादामहाराज हयात नाहीत तरी माझा भाऊ सुनील नवघरे हा अजुनही बाबांची इतकी सेवा करतो की, सुख म्हणजे काय, आत्म शांती म्हणजे काय हे त्याच्याकडे पाहून कळते. एक आत्मिक तेज, समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळकत असते. त्याला सतत दुसऱ्या बद्दल काळजी, मदतीची भावना असते.

आता हे कौतुक नाही सांगत पण आईवडिलांच्या संस्कारामुळे आमची ही आत्मिक सुख समाधानाची व्याख्या तयार झाली. आमच्या घरी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी आई इतकी आदराने वागायची की, सर्वांच्या मनात तिच्याबद्दल खूप आपुलकी, प्रेम, माया असायची, आईवडिल नेहमी दुसऱ्यांना मदत करायचे, त्यात आनंद, सुख मानायचे त्यात त्यांना समाधान वाटायचे.

गृहस्थाश्रम त्यांनी अगदी आदर्श रितीने पार पाडला.

आईला पाहून आम्हाला आनंद व्हायचा, सुख म्हणजे काय?

सुखाचा शोध कसा घ्यावा हे

तिच्या कडूनच शिकता आले.

ती नेहमी म्हणायची कंटाळा येतो, कंटाळा आला असे म्हणायचे नाही. नेहमी हसत मुख असायची, ती सतत काम करत असायची, कलात्मकता, सुगरणपणा, सोज्वळपणा,सहनशक्ती, देवभक्ती सारे काही तिच्याकडे होते. आदर्श गृहिणी, पत्नी,माता सगळे सद्गुण देवाने तिला बहाल केले होते. सुखाचा शोध घेण्यासाठी, कुठे जायची गरजच नव्हती.

असे मायाळू, उबदार समाधान आमच्या वाट्याला आल्यावर सुखाचा शोध आणि बोध घ्यायला दुसरीकडे जावेसे वाटले नाही. तिने कधी कुणाला दुखावले नाही. सदैव घरात आनंदी, हसरे उत्साही वातावरण असायचे, सर्व घर सांभाळून ती उरलेल्या वेळात

आपली कलात्मकता ही जपायची, देव भोळ्या, सात्विक अशा वातावरणात राहिल्यामुळे सुख म्हणजे हेच आमच्या मनावर बिंबवले गेले. सुखाच्या आणखी वेगळ्या कल्पना आम्हाला कधी सुचल्या नाही. कारण आई वडिलांमुळे

घरात नेहमीच सामंजस्याचे, प्रेमळ वातावरण असायचे. एकमेकांसाठी जगणे हेच आमचे ब्रीदवाक्य होते. व सुखाची ओळख व्हायला तेवढे पुरेसे होते. त्याकाळी अकरा बारा माणसांच्या घरात सून म्हणून वावरणे किती कठीण असेल, संसाराची पन्नास वर्षे तिने स्वतःहून घराचे एकत्र कुटुंब सांभाळले. सुखाची साडी नसेल पण सुखी संसाराची घडी मात्र तिने छान बसविली.

सुखाचा शोध लावणारी अशी होती माझी माऊली.

आज पाच वर्षे ती जरी आमच्या समोर देह रुपात नसली तरी प्रत्येक दिवशी तिचे नाव तिची आठवण येतेच.

कारण तिने स्व:कष्टाने, वडिलांच्या सहकार्याने एकत्र कुटुंब टिकवून ठेवले. आज या वयातही आम्ही सर्व भावंडे एकमेकांना धरुन आहोत,

देवाची कृपा आणि आशीर्वादामुळेच हे सर्व घडते.

सुखाचा शोध म्हणजे

अंतरात्म्याची शांती समाधान.

याची अनुभुती आम्हाला वारंवार येत असते.

हे कसे कधी लिहिले गेले कळले नाही.

आईवडिलांनीच सुखाचा शोध म्हणजे काय याची अनुभुती दिली. म्हणजे आम्हाला कधीच कुटुंबाचा, बहिण-भावंडांचा विसर पडणार नाही. तर सुखाच्या प्रेमळ वात्सल्याचा

निर्मळ झरा मनात सतत

वाहत राहिल.

तसेच समाज, नातेवाईक

यांच्याशी वागण्याचे भान राहिल.

🙏💐

 

स्वप्नगंधा सतीश आंबेतकर कलाशिक्षिका

प्रतिक्रिया व्यक्त करा