You are currently viewing सावंतवाडीत पहिले सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन

सावंतवाडीत पहिले सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन

२७-२८ डिसेंबरला कविवर्य केशवसुत साहित्यनगरीत साहित्य, लोककला व विचारमंथनाचा भव्य सोहळा

 

अलक्षित साहित्यिक, लोककला आणि नव्या विचारांचा संगम; मान्यवर लेखक-अभ्यासकांची उपस्थिती

सावंतवाडी :

मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अनुदानातून, श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन सावंतवाडी यांच्या वतीने पहिले सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन २०२५ येत्या शनिवार दि. २७ व रविवार दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी कविवर्य केशवसुत साहित्यनगरी, राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्रा. प्रवीण बांदेकर यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

प्रा. बांदेकर म्हणाले, मराठी भाषा विभाग व साहित्य संस्कृती मंडळाच्या अनुदानातून पहिल्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अलक्षित साहित्यिक व लोककला यांच्यावर मान्यवर व अभ्यासकांकडून मौलिक विचारमंथन यातून घडणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. २७ डिसेंबरला सायंकाळी ४ वा. ग्रंथदिंडी तर रविवारी २८ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० ला. कविवर्य केशवसुत साहित्यनगरीत उद्घाटन समारंभ होणार असून उद्घाटक म्हणून डॉ. सुशीलकुमार लवटे, संमेलनाध्यक्ष श्रीम. नीरजा असणार आहेत. तर विशेष उपस्थिती डॉ. दासू वैद्य, प्रकाश होळकर, प्रा. श्रीधर नांदेडकर, श्रीम. संपदा कुलकर्णी यांची असणार आहे. तसेच शिक्षणाधिकारी गणपत कळमकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, भरत गावडे, विठ्ठल कदम, शेखर सामंत, डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ. शरयू आसोलकर, वृंदा कांबळी, वामन पंडित, म.ल.देसाई उपस्थित राहणार आहेत.

याचवेळी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील ज्येष्ठ व युवा मान्यवरांचा सत्कार तसेच संमेलनपूर्व विविध स्पर्धातील विजेत्यांचा पारितोषिक प्रदान समारंभ होणार आहे. यात विठ्ठल गावंकर, ना.शि.परब, आबा रणसिंग, गणपत परब, विजयालक्ष्मी भोसले, डॉ. अशोक सुर्वे, संजीवनी देसाई, प्रभाकर भागवत, बबन परब, आनंद देवळी, अनिल हळदिवे, प्रसाद गावडे, रवी जाधव, प्रमोद दळवी, अक्षय सावंत, मेगल डिसोझा, पूजा गवस यांचा सत्कार करण्यात येणार आहे. पहिल्या सत्रात अभिनेत्री डॉ. संपदा कुलकर्णी-जोगळेकर यांची विशेष मुलाखत डॉ. सुमेधा नाईक-धुरी, प्रा. अमर प्रभू घेणार असून दुसऱ्या सत्रात सिंधुदुर्गातील अलक्षित साहित्यिक या विषयावर परिसंवाद होणार आहे. डॉ. गोविंद काजरेकर, प्रा. एन.डी.कार्वेकर, प्रा. वैभव साटम प्रमुख वक्ते असणार असून अध्यक्षस्थानी डॉ. बाळकृष्ण लळीत राहणार आहेत. तिसऱ्या सत्रात विविध साहित्य प्रवाहांना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे योगदान यावर परिसंवाद होणार असून डॉ. शरयू आसोलकर, अंकुश कदम, डॉ. सई लळीत, कल्पना मलये वक्ते तर अध्यक्षस्थानी उषा परब असणार आहेत. चौथ्या सत्रात कविसंवाद होणार असून दासू वैद्य, प्रकाश होळकर, श्रीधर नांदेडकर, अजय कांडर यांचा सहभाग असणार आहे. तसेच विस्मरणातील कविता दादा मडकईकर, वामन पंडित, सरिता पवार, प्रा. केदार म्हसकर, विजय ठाकर सादर करणार असून अध्यक्षस्थानी मोहन कुंभार राहणार आहे. सायंकाळी ६ वा. सिंधुदुर्गातील लोककलांचे सादरीकरण होणार असल्याची माहीती प्रा. बांदेकर यांनी दिली‌. यावेळी श्रीराम वाचन मंदिरचे कार्यवाह रमेश बोंद्रे, सहकार्यवाह गणेश बोर्डेकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा