You are currently viewing परराज्यांच्या नौकांवर आता थेट तंत्रज्ञानाचा पहारा

परराज्यांच्या नौकांवर आता थेट तंत्रज्ञानाचा पहारा

स्टील गस्ती नौका, ड्रोन आणि AIच्या मदतीने बेकायदेशीर मासेमारीला लगाम – मंत्री ना. नितेश राणे

 

नागपूर :

कोकणातील समुद्रात परराज्यातील नौकांद्वारे होणारी बेकायदेशीर मासेमारी रोखण्यासाठी राज्य सरकारने निर्णायक पावले उचलली असून मत्स्य विभागाकडून आता हायटेक सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी विधानसभेत ही माहिती देताना, स्टीलच्या १५ अत्याधुनिक गस्ती नौकांची ऑर्डर देण्यात आल्याचे स्पष्ट केले. यापैकी ५ नौका याच महिन्यात उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार भास्कर जाधव यांनी कोकणातील समुद्रातील परराज्यांच्या नौकांची घुसखोरी आणि सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना ना. राणे म्हणाले की, परराज्यांच्या नौकांद्वारे होणारी मासेमारी हा अत्यंत गंभीर विषय असून मत्स्य विभागाने तो गांभीर्याने घेतला आहे.

सध्या विभागाकडे असलेल्या गस्ती नौका लाकडी असल्याने त्या स्टीलच्या बळकट नौकांसमोर तोकड्या ठरत असल्याचे त्यांनी मान्य केले. रत्नागिरी किनारपट्टीवर कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर हल्ले झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे लाकडी नौकांद्वारे परराज्यांच्या नौकांवर नियंत्रण ठेवणे शक्य नसल्याचे मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

याच पार्श्वभूमीवर १५ स्टील गस्ती नौका खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जानेवारीपासून ९ ड्रोनद्वारे समुद्र सुरक्षा व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. या ड्रोनमुळे नौका कुठून येतात, त्यांचा क्रमांक कोणता आहे, याची अचूक माहिती मिळणार आहे.

यावेळी ना. राणे यांनी एक महत्त्वाचा खुलासा करत सांगितले की, खात्यातील सर्वच अधिकारी १०० टक्के प्रामाणिक नसतात. अंतर्गत मदतीशिवाय परराज्यांच्या नौकांची घुसखोरी शक्य नाही, हेही वास्तव त्यांनी सभागृहात मांडले.

मंत्री नितेश राणे यांनी पुढे सांगितले की, गेल्या एक वर्षात परराज्यांच्या नौकांवर तब्बल १८७६ कारवाया करण्यात आल्या आहेत. भविष्यात या कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असून आधुनिक गस्ती नौका, ड्रोन आणि AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बेकायदेशीर मासेमारीवर पूर्णतः अंकुश ठेवला जाईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला..

प्रतिक्रिया व्यक्त करा