*ज्येष्ठ लेखिका कवयित्री पत्रकार मेघा कुलकर्णी “मेघनुश्री” लिखित अप्रतिम लेख*
*नित्य सुविधा? सुव्यवस्था ?*
जसे अन्न, वस्त्र, निवारा ही मानवाची मूलभूत गरज आहे, तसेच सामाजिक स्तरावरही अनेक सुविधांची गरज भासते. आजच्या धावत्या युगांत वेळ वाचवण्यासाठी वाहनांचा प्रचंड प्रमाणांत उपयोग होत आहे. दुचाकी – चारचाकी ची गर्दी नेहमीच पहायला मिळते. त्यांत सर्कस म्हणजे रस्त्यांची झालेली ‘खड्डाचाळण’ आज जीवघेणी ठरत आहे. शहरे आणि त्यांच्या लगतचे महामार्ग जरी सुस्थितीत असले तरी, ग्रामीण भाग पूर्णपणे दुर्लक्षित झाला आहे. दुग्धव्यवसायिक, रिक्षाव्यवसायिक आणि लाखों सामान्य नागरिक या समस्येलाच दिनक्रमांत तोंड देत असतात. केलेली रस्त्यांची कामे मुसळधार पडणाऱ्या धो-धो पावसांत तोंड ‘आ’ वासतात आणि पुनश्च दैनिक संघर्ष सुरू होतो. ‘खड्डेचाळण’ पहाता असे निदर्शनांस येते कि हा पाऊस असाच सातत्याने पडत राहिला तर या खड्ड्यांची नदी होऊ शकेल आणि वाहने बाजूला ठेवून होडी किंवा नावेने प्रवासाची सुरवांत होईल. निसर्गचक्राप्रमाणे प्रत्येक ऋतू आपले काम चोख बजावणार पण त्याला मानवाची योग्य साथ मिळाली तरच तो सुसह्य होऊ शकतो. नाहीतर मनुष्य दुखण्यांनी, व्याधींनी त्रस्त होतोच आहे.
पादचारी चालताना हैराण आणि वाहनधारक पाण्याने भरलेल्या खड्डयातून वेडेवाकडे वळत, जीवावर उदार होऊन आपल्या वाहनाचे सारथ्य करत असतात. मुलेबाळे, महिलावर्ग सोबत असल्यास गाडी चालवताना अधिक सावधानतेची आवश्यकता वाटते. त्यांत काही महाभाग विशेषतः तरुणाई, खड्डयातील पाणी इतरांच्या अंगावर कसे उडेल याची मजा घेत रहातात, हे सर्व पाहिले कि मन प्रचंड अस्वस्थ होते. जनसामान्यांची अपेक्षित भावना एक लेखिका म्हणून संवाद साधताना सामोरी आली, तसेच मिळणाऱ्या प्रतिक्रियेतून, स्वानुभवातून आग्रहास्तव सर्वांसमोर मांडता आली. शीर्षकांतील प्रश्नचिन्हाचे उत्तर मिळेल तो क्षण माझ्या व इतर नागरिकांचा, ज्यांनी हा प्रश्न उचलून धरला त्यांच्यासाठी प्रचंड आनंदाचा असेल. पाऊस नसताना खराब रस्त्यांमुळे उडणारा धुरळा, होणारे छोटे-मोठे अपघात हे सुद्धा खूप गैरसोयीचे आहे. रस्त्यांची दुरावस्था जर सुव्यवस्थेत परावर्तीत झाली तर नागरिकांचे आरोग्य उत्तम राहून, तो चांगल्या प्रकारे अधिकाधिक तासिका कामासाठी देऊ शकेल व यांतूनच ग्राम, नगर, राज्य आणि देशाची उन्नती साधली जाईल.
©मेघनुश्री [लेखिका पत्रकार]
मोबाईल : ७३८७७८७५१२
