You are currently viewing तरंदळे धरणातील दुहेरी आत्महत्येचा तपास वळणावर

तरंदळे धरणातील दुहेरी आत्महत्येचा तपास वळणावर

तरंदळे धरणातील दुहेरी आत्महत्येचा तपास वळणावर;

सोहमचा ‘हरवलेला’ नव्हे तर विकलेला मोबाईल पोलिसांच्या हाती

कणकवली :
तरंदळे धरण परिसरात घडलेल्या सोहम चिंदरकर (२२, कलमठ–कुंभारवाडी) आणि ईश्वरी राणे (१८, कणकवली–बांधकरवाडी) यांच्या दुहेरी आत्महत्येप्रकरणी पोलिसांना महत्त्वाचा धागा सापडला आहे. सोहमचा हरवला म्हणून सांगितला गेलेला मोबाईल प्रत्यक्षात त्यानेच कणकवलीतील एका विक्रेत्यास विकल्याचा धक्कादायक खुलासा झाला असून पोलिसांनी हा मोबाईल शुक्रवारी ताब्यात घेतला आहे.

घटनेनुसार, ‘माझा मोबाईल हरवला असून त्यात आक्षेपार्ह फोटो-व्हिडिओ आहेत. मोबाईल कोणाला सापडला तर बदनामी होईल’, असा मेसेज सोहमने आईच्या मोबाईलवरून ईश्वरीला पाठवला होता. ईश्वरीने समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र सोहमने न ऐकल्यामुळे दोघांनी थेट तरंदळे धरण गाठून पाण्यात उडी मारून आत्महत्या केली.

सोहमच्या मोबाईलमध्ये नेमके काय होते? हा प्रश्न पोलिसांसमोर होता. मोबाईल बंद असल्याने त्याचे लोकेशन मिळत नव्हते. अखेर विविध मार्गांनी तपास करून पोलिसांनी शहरातील एका विक्रेत्याकडून हा मोबाईल जप्त केला. विक्रेत्याने ‘मोबाईल सोहमनेच विकला होता’ अशी माहिती दिली. मोबाईल ‘फॉरमॅट’ अवस्थेत असल्याने त्यातील आक्षेपार्ह माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. हा फॉरमॅट सोहमनेच केला होता का, याचीही चौकशी सुरू आहे.

दरम्यान, सोहमने आईच्या मोबाईलवरून ईश्वरीला धरणावर बोलावले आणि तेथे दोघांनी शेवटचा संवाद साधला, असे तपासात स्पष्ट झाले आहे. मोबाईल मिळाल्यामुळे दोघांनी टोकाचे पाऊल का उचलले, यामागील सत्य लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा