देशात 2024 ला पुन्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तर 90 टक्के कामगार कायदे मोडीत निघतील, अशी भीती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलून दाखवली आहे. तसंच कामगारांना युनियन देखील करता येणार नाही, असा दावा करत भाजपला इथून पुढे निवडून न देण्याचं आवाहन त्यांनी केलं.
जयंत पाटील राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेच्या निमित्ताने जळगाव दौऱ्यावर आहेत. काल एका सभेच्या निमित्ताने जयंत पाटील यांनी पंतप्रधान मोदी तसंच भाजप सरकारवर शरसंधान साधलं.
यावेळी बोलताना त्यांनी देशात 2024 ला पुन्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तर 90 टक्के कामगार कायदे मोडीत निघतील, असं मोठं वक्तव्य केलं.
काय म्हणाले जयंत पाटील..?
देशात 2014 ला भाजपचं सरकार आलं. पहिल्या टर्मची पाच वर्ष पूर्ण केल्यानंतर देशवासियांनी पुन्हा एकदा भाजपला कौल दिला. मात्र आज आपण पाहतो आहोत की शेतकरी, कामगार वर्गाचं ऐकून घ्यायला सरकार तयार नाही. त्यांच्या हिताचे निर्णय सरकार घेत नाही.या वर्गाला देशोधडीला लावायचं काम सरकारने केलं आहे. तेव्हा देशात पुन्हा 2024 ला भाजपचं सरकार आलं तर 90 टक्के कामगार कायदे मोडीत निघतील. देशातल्या कोणत्याच कामगाराला आपल्या हिताचे संरक्षण करण्याकरिता कायदे करता येणार नाही अशी व्यवस्था मोदी सरकारने केली आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
एकनाथ खडसे आणि गोपीनाथ मुंडेंमुळे भाजपला राज्यात ओळख
देशात भारतीय जनता पार्टी पक्ष हा पुंजी पंती लोकांचा पक्ष आहे समजलं जायचं परंतु गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्यामुळे भाजपा हा बहुजनांचा पक्ष आहे म्हणून अशी ओळख निर्माण झाली. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला प्रतिसाद मिळायला लागला आणि त्याच कारणामुळे भाजपला सत्ता स्थापन करता आली, असंही जयंत पाटील म्हणाले.
शेतकरी कामगारांचं शोषण सुरु
स्वातंत्र्यापासून भाजपा वाले पुंजी पंती लोकांचं हित संपादन करतील साधतील असं लोकांना वाटायचं मात्र नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून देशात शेतकऱ्यांच्या संबंधित मदत करण्याचे कायदे मोडित निघताना दिसत आहेत. कारखान्यांमधील कामगारांना काढून टाकण्याचा अधिकार कारखानदाराकडे या मोदी सरकारने दिले आहेत, असे आरोप जयंत पाटील यांनी केला.