You are currently viewing मंजूर रेखांकनातील रस्ता अडवल्याप्रकरणी सालईवाडा रहिवाशांनी दिले सावंत बंधूंच्या विरोधात सावंतवाडी पोलिस ठाण्यात निवेदन*

मंजूर रेखांकनातील रस्ता अडवल्याप्रकरणी सालईवाडा रहिवाशांनी दिले सावंत बंधूंच्या विरोधात सावंतवाडी पोलिस ठाण्यात निवेदन*

सावंतवाडी :

सावंतवाडी सालईवाडा येथील महिला समाज आश्रमच्या मागे जवळपास १०० पेक्षा जास्त कुटुंब वास्तव्यास असून जन. जगन्नाथराव भोसले उद्यानच्या बाजूने महिला आश्रमच्या मागे सालईवाडा भागात जाणारा रस्ता गेल्या ४५ वर्षांपेक्षा जास्त काळ तेथील रहिवाशांच्या वहिवाटीत आहे. असे असताना देखील विषयांकीत जागेचे भूतपूर्व जमीन मालक कै.सुखदेव बापू सावंत यांचे चिरंजीव विनोद सुखदेव सावंत व पोलिस अधिकारी असलेले प्रसाद सुखदेव सावंत यांनी सदर भागात जाणाऱ्या रस्त्यावर जेसीबीच्या सहाय्याने भले मोठे खडक टाकून दादागिरी करून जबरदस्ती रस्ता रहदारीसाठी बंद केला होता. यावेळी त्याभागात राहणाऱ्या रहिवाशांनी त्याला मज्जाव करून रस्ता मोकळा करून देण्यास भाग पाडले व वारंवार रस्ता जबरदस्ती बंद करतात त्यांना समज देणे व पुन्हा रस्त्यावर अटकाव करण्यास मज्जाव करण्याकरिता सदर भागातील जवळपास ५०/६० रहिवाशांनी सह्यांचे निवेदन सावंतवाडी पोलिस ठाण्यात दिले आहे.

सदर रस्ता प्रकरण असे की, विषयांकीत रस्ता ज्या जागेतून जातो त्या जागेचे रेखांकन तत्कालीन जमीन मालक कै.सुखदेव बापू सावंत यांनी २२/७/१९८० रोजी (भुखंड क्र.१ ते २०) मंजुरीकरीता पाठवले होते. न. प. सावंतवाडीने सदर रेखांकनास २२/२/१९८१ रोजी मंजुरी दिली होती. सदर रेखांकनातील काही भूखंड जमीन मालकांनी पटेकर, सावंत, धारगळकर, मिशाळ आदींना विक्री केले होते. भूखंड विक्री केल्यानंतर मंजूर रेखांकनानुसार त्यांना रस्ता उपलब्ध देणे तसेच विकसित करून देण्याची जबाबदारी जमीन मालकांची असते. त्याप्रमाणे तत्कालीन मालकांनी ९ मीटरचा रस्ता बक्षिसपत्राने सोडला होता. परंतु सदर मंजूर रेखांकनातील उर्वरित भूखंड पोष्ट खात्यासाठी संपादित केल्याने पोष्ट खात्याने मंजूर रेखांकनाच्या मध्यभागी असलेला ९ मीटर रुंदीचा रस्ता इतर भूखंड धारक रहिवाशांकरिता रेखांकनाच्या एका बाजूने सोडून आपला संपूर्ण भूखंड एकसंध ठेवला आणि आज रोजी त्याठिकाणी पोष्टाची इमारत उभी राहिली असून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. सदर जागा पोष्टाने संपादित करताना शासनाकडून सावंत यांना जागेचा मोबदला दिला गेला होता. परंतु सदरचा ९ मीटर रुंदीचा रस्ता जागेचे रेखांकन केलेले तत्कालीन मालक असलेले कै.सुखदेव सावंत यांच्याच नावावर राहिला. कै.सुखदेव सावंत यांनी सदरचा रस्ता विकसित करून नगरपालिकेच्या ताब्यात देणे आवश्यक असताना तसे न केल्याने मंजूर रेखांकनातील भूखंडांना बक्षिसपत्राने मोफत मुख्य रस्त्यांना जोडणारा रस्ता दिल्याचे लिहून दिले असताना त्यांचे वारस असलेले विनोद व प्रसाद सावंत यांना वडिलांनी लेखी दिलेले व्यवहार देखील मान्य नसून ते एकदा शासनाकडून मोबदला घेऊन देखील पुन्हा त्याच मंजूर रेखांकन केलेल्या जागेचा दुसऱ्यांदा मोबदला मिळावा यासाठी वारंवार सदरचा रस्ता बंद करण्याचा प्रयत्न करून नाक दाबल्यावर तोंड उघडेल अशा वल्गना करतात.

याबाबत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या आदेशानुसार (NPA/23/13/2014) दिनांक २४ फेब्रुवारी २०१५ नुसार रेखांकनातील रस्त्याचा मोबदला पोष्ट खात्याने एकदा दिलेला असताना सबब प्रस्तुत प्रकरणी मोबदल्याकरिता संबंधित जमीन मालक अपात्र ठरतो असे सावंत व नगरपरिषदेला लेखी कळवले आहे. परंतु अट्टाहास करून सदर जागेचे आपणच मालक असल्याचे सांगत सावंत बंधू रहिवाशांना वारंवार वेठीस धरत आहेत जे कायद्याने चुकीचे आहे असे त्या भागात राहणाऱ्या रहिवाशांचे म्हणणे आहे.

यावेळी सावंत बंधूंनी शासनाने काही वर्षांपूर्वी डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर जेसीबी आणून आडवा चर खोदून रस्ता रहिवाशांच्या वापरास बंद करणार अशी धमकी दिली व रस्ता खडक टाकून बंद करण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार येथील रहिवाशांनी केली. विनोद व प्रसाद यापैकी प्रसाद सावंत हे पोलिस अधिकारी असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने सालईवाडा भागातील ५०/६० कुटुंबांनी एकत्र येत सावंतवाडी पोलिसांना विनोद सावंत व प्रसाद सावंत बंधूंना समज देऊन पुन्हा रस्ता बंद न करण्याची ताकीद देण्याबाबत सह्यांचे निवेदन देऊन विनंती केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा