You are currently viewing कणकवलीत शेअर मार्केटमध्ये जलद नफ्याचे आमिष

कणकवलीत शेअर मार्केटमध्ये जलद नफ्याचे आमिष

कणकवलीत शेअर मार्केटमध्ये जलद नफ्याचे आमिष;

तरुणीची १२ लाखांहून अधिकांची फसवणूक

कणकवली

अल्पावधीत प्रचंड नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत कणकवलीतील एका तरुणीची तब्बल १२ लाख २७ हजार ८०० रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा परतावा देण्याचे आश्वासन देत हा गंडा घातल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संदीप अंकुश पाटील (४०, रा. राजारामपुरी, कोल्हापूर) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फसवणूक डिसेंबर २०२४ ते जून २०२५ या काळात झाली.

कुमारी शुभांगी अशोक मादनाईक (३८, रा. कलमठ गावडेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की वडिलांच्या मृत्यूनंतर आरोपी पाटील याने त्यांच्या संपर्कात येत विश्वास संपादन केला. शेतजमीन विक्रीसंदर्भात मदत करण्याच्या बहाण्याने त्याने संवाद वाढवला. सप्टेंबर २०२४ मध्ये तो त्यांच्या घरी येऊन ‘शेअर मार्केट प्रशिक्षण’ आणि ‘स्वतः गुंतवणूक करून मोठा नफा’ देण्याचे प्रलोभन दिले. त्यानुसार डिसेंबर २०२४ मध्ये शुभांगी यांनी त्याला ४५ हजार रुपये दिले.

मे २०२५ मध्ये मादनाईक यांच्या कुटुंबाने शेतजमीन विक्रीतून मिळालेले २० लाख रुपये बँक ऑफ इंडियाच्या खात्यात जमा केले. ही माहिती मिळताच पाटील याने वारंवार गुंतवणुकीसाठी पैसे मागण्यास सुरुवात केली. या काळात शुभांगी यांनी २ ते २४ जून २०२५ दरम्यान ११ लाख १६ हजार रुपये, तसेच इतर व्यवहारांसह एकूण १२ लाख ६१ हजार रुपये त्याच्या मोबाईल क्रमांकावर ट्रान्सफर केले.

सुरुवातीला नफ्याचे कारण देत पाटील यांनी ३३ हजार २०० रुपये परत केले; मात्र मुख्य रकमेबाबत चौकशी केली असता विविध कारणे देत टाळाटाळ सुरू केली. शेवटी फसवणुकीची जाणीव होताच शुभांगी यांनी पोलिसांत धाव घेतली.

संदीप पाटील याने घेतलेल्या १२ लाख ६१ हजार रुपयांपैकी फक्त ३३ हजार २०० रुपये परत केले असून १२ लाख २७ हजार ८०० रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा