*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*लिहिणं म्हणजे उगवणं*
कल्पनेच्या भूमीत
शब्द मी पेरले
काव्याची मृदु रोपे
ओळी ओळीत दाटले…
उपमा अलंकारांचे
घातले खत पाणी
योग्य अर्थ जुळवत
राखली निगराणी….
लय शब्द तालात
रोप डोलू लागलं
कवितेचं अंगण
आता गच्च बहरलं ….
पुन्हा पुन्हा लक्ष देत
निगा छान ठेवली
ओढाताण शब्दांची
ओळीतून वजा केली…
बघत राहिले घटकाभर
बहरलेलं काव्यरूप
समाधान मनात वाटलं
जागरूक राहिले खूप…
आसमंती डोलणारे
बघते आता काव्यधन
लिहिलेलं बहरून आलं
प्रसन्न झालं मन…!!
•°°°•°°°•°°°•°°°•°°°•°°°•°°°•
अरुणा दुद्दलवार@✍️

