*सावंतवाडी तालुका विज्ञान प्रदर्शनात सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे धवल यश.*
सावंतवाडी
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि पंचायत समिती सावंतवाडी आयोजित,५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संस्कार इंटरनॅशनल स्कूल निरवडे या ठिकाणी पार पडले. या प्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी, गटशिक्षणाधिकारी सविता परब, संस्कार इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन शेखर जैन, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर, सावंतवाडी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश गावडे, केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर, रामचंद्र वालावलकर, बी आर सी समन्वयक स्नेहा गावडे उपस्थित होते. सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली शाळेच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रतिकृती माध्यमिक गटात तृतीय क्रमांक पटकावला. कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिकला पर्याय या विषयावर कॅडेट नील हेगिस्टे याने ही प्रतिकृती बनवली होती. माध्यमिक गटात एकूण २९ विज्ञान प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या. प्राथमिक गट प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सैनिक स्कूलच्या कॅडेट गौरांग संदीप पेडणेकर आणि कॅडेट धनुष गोविंद परब या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. प्रदर्शनास प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांनी भेट दिली. विजेत्या विद्यार्थ्यांचे सैनिक स्कूल अध्यक्ष श्री सुनील राऊळ, सचिव जॉय डान्टस, कार्यालयीन सचिव दिपक राऊळ प्राचार्य नितीन गावडे , सर्व शिक्षक व पालक यांनी कौतुक केले.

