You are currently viewing सुसंस्कृत,शांत सुंदरवाडीचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवू नका”..

सुसंस्कृत,शांत सुंदरवाडीचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवू नका”..

“सुसंस्कृत,शांत सुंदरवाडीचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवू नका”..
अँड.नकुल पार्सॅकर,सदस्य शांतता समिती सिंधुदुर्ग…

सावंतवाडी अर्थात सुंदरवाडी सगळ्याना अडकून पाडी.सावंतवाडी म्हणजे परमेश्वराला पडलेले एक सुंदर स्वप्न. असे सावंतवाडीचे वर्णन कवीवर्य स्व.डॉ.वसंत सावंत यानी केलेले आहे.संस्थानचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या शहराच्या जडणघडणीत स्व.बाप्पा नार्वेकर,स्व.शिवराम राजे भोसले,स्व.बाप्पा नार्वेकर,स्व रामभाऊ परुळेकर,स्व.जयानंद मठकर, माजी नगराध्यक्ष स्व.वाडकर,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्व.तत्कालीन जिल्हासंघचालक स्व.लेले अशा सेवाभावी महानुभावांचे फार मोठे योगदान आहे.नोकरी निमित्ताने येणारा प्रत्येकजण या शहरात स्थायिक होण्यासाठी धडपडत असतो.मी भेडशी सारख्या ग्रामीण भागातून १९८१ मध्ये शिक्षणासाठी आलो.तेव्हापासूनचं या सर्वाथाने सुंदर अशा शहराच्या प्रेमात पडलो.
परंतू या शहरातील शांतता आणि सौहार्द आता धोक्यात आल्याची जाणीव मला हल्ली काही शहरात होणाऱ्या घटनांमुळे होवू लागली नव्हे जाणवायला लागले.सावंतवाडीच्या सामाजिक,सांस्कृतिक व शैक्षणिक जडणघडणीत एक कार्यकर्ता म्हणून माझाही सहभाग असतो.सत्तास्थाने एनकेन प्रकारे काबीज करून आपलेच वर्चस्व राहिले पाहिजे यासाठी राजकीय पक्ष,त्यांचे नेते आणि दिशाहीन कार्यकर्ते यानी सावंतवाडीतचं नव्हे तर संपूर्ण देशातचं जे राजकारण सुरु आहे ते खरोखरच दुर्देवी आहे.वाम मार्गाने येणारा रद्दीसारखा पैसा आणि त्या पैशाच्या जोरावर पोसल्या जाणाऱ्या बेरोजगार तरुणांच्या झुंडी यामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक व कौटुंबिकही समस्या यावर गांभीर्याने विचार करायला नेत्यानां गरज वाटत नाही.पूर्वी माझ्यासारखे काही कार्यकर्ते आदरणीय अटलजींचे विचार ऐकण्यासाठी पणजी,बेळगाव येथे लालपरीत बसून स्वखर्चाने जात असू.आज वातानुकूलित गाड्यांमधून सभांसाठी विशेष पॅकेज देवून माणसं आणली जातात.विशेष म्हणजे बहुतेक सर्वपक्षीय असतात.जिथे मिळेल तिथे जातात त्यांचा विचारधारेशी काहि संबंध नसतो.
सुमारे पस्तीस वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे शहर कार्यालय हे तारा हाॅटेलच्या पाणंदित गोकर्ण भटजी रहात होते त्या पडक्या इमारतीत होते.ज्याचे व्यवस्थापन मी व बाळ पुराणिक बघायचो.कार्यालयात दैनंदिन कामकाज पहाण्यासाठी सावंत म्हणून नियुक्त केलेले होते.त्याना दरमहा पाचशे रूपये देताना नाकात दम यायचा.स्व.आबा नाईक,स्व.आबा बांदेकर,डॉक्टर योगेश करमरकर अशा काही ठराविक जणांकडून वर्गणी गोळा करत असू..पण आज तोच भारतीय जनता पक्ष सर्वार्थाने ” ताकदवान ” आहे.सत्तेसाठी व लाभासाठी इतर पक्षातील कार्यकर्त्यांच्या झुंडीच्या झुंडी राष्ट्रीय प्रवाहात सामील होत आहे.
यापूर्वीच्या अनेक निवडणूका मी अनुभव ल्यात ,वैचारिक मतभेद जरूर होते.पण मतदाना दिवशी सुद्धा हलकं फुलकं वातावरण असायचे.एकमेकांच्या बूथवर बसुन चेष्टा मस्करी चालायची…पण आतातर अगदी पोलीस स्टेशनच्या आवारात एकमेकांचा जीव घेण्याची भाषा बोलली जाते.आदरणीय स्व.मधू दंडवते यांच्या एका निवडणूकीत गांधी चौकात झालेला गोळीबार वगळता निवडणूकीच्या काळात असे राडे झालेले मी तरी पाहिले नाहीत.
अवघे वीस हजाराच्या आसपास मतदार संख्या असलेल्या या सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणूकीत तब्बल वीस वीस हजार रुपये देऊन एक एक मतं विकत घेतलं जातं.कोट्यावधी रूपयांचे खुलेआम विशेष यंञणा लावून वाटप केलं जात हे फारच भयंकर आहे.या प्रक्रियेत जेव्हा सुचिर्भूत पणाचा आव आणून चारित्र्याच्या गप्पा सांगणारे जेव्हा सहभागी होतात तेव्हा हे पाहून आमचाच मेंदू बधीर होतो.
चार दिवसांपूर्वीच सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये जो राजकीय राडा झाला ही घटना अतिशय निंदनीय आहे.सुसंस्कृत सावंतवाडीच्या शांततेला बाधा आणणारी आहे.कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणाऱ्यां पोलीस प्रशासनालाच जर हे जुमानत नसतील तर हे कुणाला आवर घालणार ? मालवण येथील घडलेल्या प्रकरणाचा विचार करता जेथे सत्ताधारी पक्षाचे आमदारचं हतबल झाले तेथे सामान्यांचे काय?सावंतवाडीचे संयमी पोलीस निरीक्षक श्री अमोल चव्हाण व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी ही परिस्थिती योग्यरीत्या हाताळली म्हणून पुढचा अनर्थ टळला.त्यांचे अभिनंदन.
राजकीय दबाव असला की अधिकाऱ्यांची पण कुचंबणा होते.त्यांचाही नाइलाज असतो.आता दोन्ही गटावर परस्पर गुन्हे दाखल झालेले आहेत. राजकीय गुन्हेगारांना सहसा शिक्षा होत नाही कारण त्यानी जनतेच्या हितासाठीच गुन्हा केलेला असतो.त्या त्या पक्षाचे नेते नेहमी प्रमाणेच आपली राजकीय ताकद वापरून त्याना मदत करतील…आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या.
एक करदाता व सजग सामाजिक कार्य कर्ता म्हणून माझे राजकीय वर्चस्वासाठी निवडणूकीत असे राडे करून शहराची शांतता व सौहार्दता बिघडवू पहाणार्‍याना माझी नम्र विनंती आहे की असे विकावू राजकारण बंद करा आणि या शहराचे पावित्र्य टिकवा नाहीतर श्री देव उप्रलकर व श्री देव पाटेकर तुम्हांला कधीच माफ करणार नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा