*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम लेख*
*वर्षांचं गोड शेंडेफळ! डिसेंबर*
वर्षाचा शेवटचा महिना .. डिसेंबर..गुलाबी थंडीचा..कोवळ्या उन्हाचा..फळाफुलांच्या समृद्धीचा.. हुरडा खाण्याचा… सहल आयोजनाचा. उत्साहाचा..चैतन्याचा.. गारव्याने भारलेला..धुंदफुंद मस्तीचा..!
वर्षाचा बारावा शेवटचा महिना… शेंडेफळ जणू,! म्हणूनच सर्वांचा लाडका हं तू!
थंडी गुलाबी …हवा ही शराबी..
मग काय तरूणाई जोशात आली नाही तरच नवल! पर्यटनासाठी हा महिना एकदम बेस्ट! छान झुळझुळणारी थंड हवा सर्वांना फ्रेंश ठेवते. विपुल भाज्या फळे उपलब्ध असल्याने खाण्याची मजा काही औरच असते. खवय्यांचा हा लाडका महिना..सांबारवडी..( कोथींबीर वडी) समोसे .. गाजर हलवा.. फ्रूट सॅलड.. कांद्याची भजी.. वेगवेगळ्या भाज्या..बैंगनका भरता..मस्त गरमागरम भाकरी..लोणकढं तूप.. जिभेचे चोचले पुरविण्यात हा महिना एक नंबर हं! हुरडा पार्टी तर चार चांद लावते.व्यायाम नी पौष्टिक डिंकाचे लाडू हे समीकरण ही तुझेच हं! व्यायाम करा…नी तब्येत बनवा हा तुझा संदेश खासच हं! पर्यटनासाठी तर तू सर्वांची पहिली पसंती! हिरवागार निसर्ग तुझ्या तून(through )सगळ्यांना साद घालतो. पहाटेची गुलाबी हवा.. क्षितीजावरचे लाल केशरी शिंपण..नागमोडी पायवाट..धुक्याची शाल पांघरलेली वसुधा…बा. डिसेंबरा! फिरण्याची हौस तूच भागवितोस रे!
तरूणाईला मस्ती करायला प्रोत्साहन देतो न, हा लबाड! एकतीस डिसेंबरचे वेध लागतात सगळ्यांना ! पार्टी.. सेलिब्रेशन नवं वर्षाचे स्वागत…आनंदाला उधाण येतं नुसतं!पण सेलिब्रेशन
सकारात्मक पातळीवर व्हायला हवे. आनंद लुटा पण सांभाळून! जबाबदारीने..नुसता धांगडधिंगा नको. काही दुःखद वार्ता नकोत.
उगवत्या सूर्याला सगळेच सामोरे जातात पण मावळत्या लाही दिमाखात निरोप द्यायला हवा.त्याने दिलेल्या सुखद आठवणीसाठी कृतज्ञ रहायला हवे. मन हळवं होतं न अशा वेळी! पण निसर्ग नियम आहे हा! एकाची जागा दुसरा घेतच असतो. काळ गतीमान आहे. कुणासाठी थांबत नाही तो! उगवणा-याला कधी न कधी मावळावे लागतेच. हे डिसेंबरा. केवढी मोठी जाण देतोस रे तू आम्हाला!
डिसेंबर! इंग्रजी कॅलेंडरचा अंतीम महिना! काळाची गती किती अगाध आहे नाही? पहाता पहाता 2025 साल सरले नी हा डिसेंबर उगवला. डिसेंबर… सर्वांना निरोप देणारा..डोळे पाणावणारा!..निरोपाचा क्षण! मग तो कुठल्याही निरोपाचा असो,मन भारावतेच. वर्षभराच्या सगळ्या कटू गोड आठवणींना उजाळा देणारा हा महिना! काय चांगल्या गोष्टी केल्या..काय चुकले ..काय फसले..कुठे कमी पडलो..कुणाला सुखावले कुणाला दुखावले ..सगळा लेखाजोखा हा महिना मांडतो. त्यातून सुधारण्याची संधी मिळते.केलेले संकल्प पूर्ण झाले की नाही.. त्यासाठी चिकाटी ठेवली की नाही.. प्रयत्न केलेत की नाही हे पाहिले जाते. नी त्यातूनच प्रगतीचा मार्ग खुला होतो. .
हे डिसेंबरा! आम्ही तुझे खूप आभारी आहोत सरत्या वर्षाला नी आगामी वर्षाला जोडणारा दुवा आहेस तू..जुन्या नव्याला जोडणारा सेतू आहेस तू!मागचे चूकभूल विसरून नवीन वर्षात आनंदाने पदार्पण करायला शिकवितोस तू! जाणा-याचे दुःख विसरून..नव्याचे स्वागत करायला शिकवितोस तू! परिवर्तन अटळ आहे ते आनंदाने स्विकारण्याचा किती मोलाचा संदेश देतोस रे तू!
म्हणून हे लाडक्या डिसेंबरा आम्हीही , डोळ्यात पाणी असले तरी ,तुला आनंदाने निरोप देणार हो! टाटा..गुड बाय बाय रे!
सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर.
