परम पूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालयात जागतिक एड्स दिन पंधरवडा उत्साहात साजरा..!
कुडाळ
परम पूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “जागतिक एड्स दिन” पंधरवडा साजरा करण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि एड्स जनजागृतीचा संदेश पसरवला.
महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी भित्तिपत्रक स्पर्धेत भाग घेतला आणि आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा केली. समुपदेशन परिसंवादाची सुरुवात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तिपत्रकांच्या उद्घाटनाने झाली.
यावेळी प्रमुख मार्गदर्शन श्री. सुनील ढोणूकसे (जिल्हा पर्यवेक्षक, जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग) आणि श्री. मानसिंग पाटील (आयसीटीसी समुपदेशक, जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग) यांनी “एचआयव्ही/एड्स जनजागृती, काळजी आणि निगा” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
त्यानंतर जागृती फाउंडेशन सिंधुदुर्गच्या माध्यमातून प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्यात सुरेश डोंगरे, अमृता परब, रोशनी पवार, अन्विता जाधव, संतोष तांबे, सिद्धेश सावंत, आणि पल्लवी पाटील यांचा सहभाग होता. यामुळे उपस्थितांना एड्स विषयी जागरूकता मिळाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रा. सचिन पाटकर यांनी एड्स जनजागृतीसह एड्स झालेल्या व्यक्तींना समाजात समान वागणूक मिळवून देण्याचे महत्त्व सांगितले. त्यांनी सांगितले की, “एड्स झालेल्या व्यक्तींच्या बाबतीत समाजातील रूढ संकल्पना बदलायला हव्यात आणि त्यांना सन्मानाने वागवायला पाहिजे.”
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जागृती फाउंडेशन सिंधुदुर्गचे सर्व सहकारी, एनएसएस विभागप्रमुख प्रा. भक्ती चव्हाण, सहाय्यक विभागप्रमुख प्रा. अंकिता नवार, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अंकिता नवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. रामदास पास्ते यांनी केले.
कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एड्स जनजागृती आणि आरोग्याची काळजी घेण्याचा संदेश प्रभावीपणे पसरला.
