*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अस्तित्व…*
अस्तित्व त्याचे म्हणूनच देह
धरू नका हो मुळीच संदेह
हालतो चालतो बोलतो आपण
तोच आहे हो त्याचेच कारण…
जलात स्थळात काष्ठ पाषाणात
अस्तित्व त्याचे चरातचरात
हालतात पाने कृपेनेच त्याच्या
बोलतो हो मुका येई त्यास वाचा..
दगडात आहे धोंड्यात राहे
नरसिंह बनूनी प्रकटे तो पाहे
रिमझिम धारा कृपा हो तयाची
उगवतात कोंभ किमया बियांची..
दोडक्यास दोडका आंब्यास आंबा
चुकतच नाही कसा तो हो सांगा
फुले ती किती हो फळे ती किती हो
निराळ्या त्या देशी प्रकार किती हो..
नद्यांत आहे तो उदधीत राहे
डोंगर माथा चढूनतो जाए
अवकाश त्याचे निळाई तयाची
सर्वत्र सत्ता आहेच त्याची…
पक्ष्यात प्राण्यात जीवाजीवात
तेल ही त्याचे दिवा नि वात
दिशादिशातून संचार त्याचा
अनिल त्याचा अनलही त्याचा..
ढगात आहे बिजलीत राहे
धारांतूनी तो बरसत आहे
बांध ही त्याचा चोचीही त्याच्या
बोरीबाभळी वसुंधरेच्या…
माती तयाची पाणी तयाचे
त्याच्याविना ना अस्तित्व कुणाचे
देह ही त्याचा श्वासही त्याचा
सोडून जाता देह कलेवराचा…
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
