मोती तलावाचा ऐतिहासिकपणा जपण्याची ग्वाही; केसरकरांच्या टीकेवर राजघराण्याची वेदना; ‘महिलांवर टीका सहन करणार नाही’ – शुभदादेवी भोंसले
सावंतवाडी । प्रतिनिधी :
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या मुद्द्यावर निवडणूक केंद्रित राजकारण केले जात असून, या प्रकल्पाबाबत जनतेत संभ्रम निर्माण केल्याचा आरोप भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले यांनी केला. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्यासोबत राणीसाहेब शुभदादेवी भोंसले उपस्थित होत्या.
युवराज भोंसले म्हणाले की, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी शासनाच्या करारावर त्यांच्या सह्या झालेल्या आहेत. “वाटल्यास उर्वरित सहीची जबाबदारीही आम्ही घेऊ. पण हॉस्पिटल होणारच,” असा त्यांचा ठाम दावा आहे. विरोधकांकडून करारातील बाबींचे चुकीचे सादरीकरण करून नागरिकांना दिशाभूल केली जात असल्याचे ते म्हणाले.
मोती तलावाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, तलाव परिसरात काँक्रीट इमारती उभारण्याचा विचार हा विरोधकांचाच असावा. “मोती तलावाचा ऐतिहासिकपणा जपणे आमचे धोरण आहे. न्यायालयीन निकाल कोणाचाही असो, तलाव हा जनतेचाच राहील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
आ. दीपक केसरकर यांनी राजघराण्यावर केलेल्या टीकेचा उल्लेख करताना युवराज भोंसले म्हणाले की, अशा प्रकारची टीका वेदनादायक असून ती निवडणूक संपल्यानंतरही लोकांच्या मनात राहील. निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर व्हायला हवी, असेही ते म्हणाले.
सावंतवाडी शहराच्या विकासासाठी मोठ्या पक्षाची आवश्यकता असल्याचे सांगून त्यांनी भाजपला एकदा संधी देण्याचे आवाहन केले. “युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले आणि सर्व भाजप उमेदवार विजयी होतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पत्रकार परिषदेत शुभदादेवी भोंसले यांनीही प्रतिक्रिया देताना, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी युवराज्ञींवर केलेल्या टीकेचा निषेध व्यक्त केला. “महिलांवर आरोप करणे योग्य नाही. टीका करताना संयम ठेवावा,” असे त्यांनी सांगितले.
