मालवणात निवडणुकीची तयारी पूर्ण;
२० मतदान केंद्रांवर सीसीटीव्हीसह कडक बंदोबस्त
मालवण
मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या सकाळी मतदान प्रक्रिया सुरू होणार असून प्रशासन व पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. शहरातील सर्व २० मतदान केंद्रांवर प्रत्येकी दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मतदान केंद्र परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शहरात आठ अधिकारी आणि चार गस्ती पथके काम पाहणार असून प्रत्येक १०० मीटरवर एक पोलीस कर्मचारी तैनात केला जाणार आहे. यासाठी एकूण ८० पोलीस कर्मचारी, ५० होमगार्ड, सहा वाहने तसेच एसआरपी गट १६ च्या दोन प्लाटून तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच ३० कर्मचारी राखीव दलात ठेवण्यात आले आहेत. शांततेत आणि उत्साहात मतदान पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे.
मतमोजणी प्रक्रिया नगरपालिका सभागृहात होणार असून ती दोन तासांत पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या दोन राऊंडमध्ये पाच प्रभागांचे चित्र स्पष्ट होणार आहे, तर पुढील दोन राऊंडमध्ये उर्वरित मतमोजणी पूर्ण होईल.
मतमोजणीदरम्यान पक्षनिहाय कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. शिंदे गटाच्या शिवसेनेसाठी त्यांच्या कार्यालयाच्या परिसरात, ठाकरे गटाच्या शिवसेनेसाठी बांगीवाडा परिसरातील युनियन बँक परिसरात तर भाजपासाठी फोवकांडा पिंपळ परिसरात थांबण्याची व्यवस्था केली आहे.
या निवडणुकीसाठी वैभववाडीचे तहसीलदार सूर्यकांत पाटील निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर पालिका मुख्याधिकारी प्रतीक थोरात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहत आहेत. संपूर्ण पोलीस बंदोबस्त पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आला आहे.
