मुंबई / विरार :
श्रुती रसाळ या युवतीचा “पापणीच्या पंखाखाली” हा प्रेममय विषयाचा, मुक्तछंदातला काव्यसंग्रह विरारमध्ये नुसताच प्रकाशित झाला. हा काव्यसंग्रह प्रकाशन होण्या आधी माझ्याकडे काव्य परीक्षणाकरता दिला होता. त्याचवेळी या कविता मला उत्तम काव्य शब्द रचनांच्या आहेत हे प्रथमतः जाणवले. यानंतर शनिवार २२ नोव्हेंबर २०२५ रोजी हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यानिमित्ताने मी श्रुतीची मुलाखत घेतली. तो मुलाखत लेख आज आपण वाचक म्हणून अनुभवावा.
श्रुतीच्या घरात कुणीही साहित्य क्षेत्रात नसताना.
श्रुतीला मराठी भाषेच्या प्रेमातून आणि शिक्षकांनी लावलेल्या कवितेच्या गोडीतून कवितेची व साहित्याची ओढ लागली. शाळेत असताना श्रुतीला मराठी भाषा साहित्याची आवड निर्माण झाली. मग ती निबंध, पत्र लेखनात रमू लागली. साहित्यिक कार्यक्रमांना श्रुती बालपणापासून जाऊ लागली. दिग्गज साहित्यिक, कलाकारांचे विचार ती आत्मसात करू लागली. या सर्वातून हळूहळू श्रुती कविता लेखनाकडे वळू लागली. त्यातून तिने स्वतःला शोधण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यातून भावना व विचार प्रगल्भ झाले. श्रुतीच्या घरच्यांना नाटकाची आवड होती. संगीत नाटकापासून विनोदी नाटकापर्यंत सर्व नाटके त्यांनी पाहिली होती.
त्यामुळे श्रुतीला लेखनाची आणि अभिनयाची ओढ निर्माण झाली. त्यातूनच तिचे लिखाण बहरले.
पापणीच्या पंखाखाली या प्रकाशित पुस्तकावर बोलताना श्रुती म्हणाली. या काव्यसंग्रहात १०४ प्रेम कवितांचा समूह आहे. कवयित्री म्हणून श्रुतीचा हा पहिला काव्यसंग्रह अगदी तरुण वयात आला आहे.
या वयात अनेकजण खऱ्या अर्थाने बाहेर येतात. जीवनाचा मनसोक्त आनंद घेतात. त्याचवेळी श्रुती नावाची एक युवती पावलागणिक आलेले जीवन अनुभव आपल्या प्रतिभेतून शब्दात मांडते. या काव्यसंग्रहात मात्र तिची निरीक्षणशक्ती तथा जीवनदृष्टी दिसून येते. आपल्या प्रतिभेतून तिने विविध प्रेमरंग शब्दात चितारले आहेत. या एका दिवसाकरता श्रुतीने अनेक वर्षांची मेहनत करून हा कवितांचा संग्रह प्रकाशित केला आहे. श्रुतीच्या “पापणीच्या पंखाखाली” वाचकांकरता कोणते प्रेममय भाव आहेत, ते काव्य रसिकांनी वेचायचे आहेत. हा प्रकाशन समारंभ श्रुतीकरता भावनिक व अविस्मरणीय असा क्षण होता. असे श्रुतीच्या संवादातून जाणवले. श्रुतीला आता कविता लिहून थांबायचे नाही तर या कवितांचा कार्यक्रम करून महाराष्ट्राच्या साहित्यप्रेमींची सेवा करायची आहे.
त्यांना आपल्या काव्य साहित्यातून उत्कट असे जीवन अनुभव द्यायचे आहेत. कारण कवयित्री भूत, भविष्य, वर्तमान बघू शकते. “कवयित्री शांता शेळके” यांनी आपल्या दृष्टीतून वेगवेगळे विलोभनीय जीवन अनुभव लोकांसमोर काव्य साहित्यातून ठेवले. त्याच प्रकारचे लेखन श्रुतीला करायचे आहे. ती त्या वाटेवरून चालत आहे.
श्रुतीच्या कवितांबाबत म्हणायचे झाले तर असे सांगता येईल. तिच्या कविता जितक्या साध्या, सोप्या भाषेत आहेत, तितक्याच त्या खोल आहेत. श्रुतीला असे वाटते कविता समुद्रासारखी असते. समुद्राच्या किनाऱ्यावर आपण बसतो, त्याकडे बघतो. त्यावेळी त्यात आपण शंख शिंपले किंवा क्षार किती आहेत हे बघत नाही तर आपले मन समुद्राचा शांत आनंद घेते. त्या लाटांची गाज, खारावारा सार काही आपण अनुभवतो. तितकीच कविता सहज व निष्पाप असते. शांतपणे मनातील कविता भावनेतून शब्दांत येते. ती शब्दात उतरते तेव्हा कवयित्रीला उच्च प्रतीचा आनंद देऊन जाते. तो आनंद कवयित्री सोबत काव्यरसिकांना मिळत असतो. म्हणून असे वाटते श्रुतीची कविता विशाल सागराच्या लाटांसारखी आहे. कारण आपल्या अंतरंगात भावनांच्या अशाच लाटा येत असतात. श्रुती हे सांगत असताना म्हणाली, आपला भावनिक, बौद्धिक विकास अवतीभवतीच्या वातावरणातून घडत असतो. त्यातून जीवन दृष्टीची समर्थ कविता जन्माला येते. या प्रवासात आपल्याला खूप चांगली माणसे मिळणे गरजेचे असते. ती माणसे काव्य कलाकाराला प्रोत्साहित करतात. अशी माणसे श्रुतीला मिळाल्यामुळे ती हा काव्यप्रवास करते आहे.
म्हणूनच श्रुतीचे प्रेरणास्थान आपल्या मराठी साहित्य क्षेत्रातील अनेक महनीय गुरुतुल्य व्यक्तींमध्ये आहे. त्या व्यक्तीनी मराठी साहित्यातून जगावर राज्य केले आहे. मराठी माणूस ज्या ज्या ठिकाणी पोहोचला त्या त्या ठिकाणी हे महान साहित्यिक आपल्या साहित्यातून या अखिल विश्वाचे वैश्विक विचारक झाले. अशा सर्व साहित्यिक, कलाकारांनी श्रुती या युवतीला द्रोणाचार्यांप्रमाणे खऱ्या अर्थाने घडवले आहे असे सांगता येईल. त्यात जगदीशजी खेबुडकर, शांताबाई शेळके, ना धो महानोर हे श्रुतीचे विशेष प्रेरणास्थान आहेत. साहित्यिकांच्या जीवन प्रवासी. मुलाखती ऐकूनच, श्रुती या तरुण कळीला विशेष प्रेरणा मिळाली आहे. तरुण वयात जीवनाचा आनंद घेणाऱ्या युवतींनी, श्रुतीकडून प्रेरणा घ्यावी आणि विविध क्षेत्रातून आपली आदर्श व्यक्तिमत्वे शोधून काढावी. त्यातूनच आपल्या कर्तुत्वाला गती मिळते. हे श्रुतीने दाखवून दिले आहे.
अशा या श्रुतीच्या पापणीच्या पंखाखाली ह्या काव्यसंग्रहाला ज्येष्ठ नाटककार स्वर्गीय गंगाराम गव्हाणकर यांची प्रस्तावना लाभली आहे. हा त्यांचा अखेरचा आशीर्वाद श्रुतीला मिळाला हे तिचे परमभाग्य आहे असे म्हणावेसे वाटते. श्रुतीची आणि गव्हाणकर सरांची भेट एका कार्यक्रमात झाली. एक तरुण मुलगी उमेदीच्या वयात साहित्य क्षेत्रात प्रगल्भतेने
काम करते हे पाहून गंगाराम गव्हाणकर यांनी तिला आशीर्वाद दिला आणि तिच्याशी आपले अनुभव शेअर केले. मग श्रुती वेळात वेळ काढून त्यांच्याकडे जाऊ लागली. त्यानंतर काही दिवसांनी गव्हाणकर सर आजारी असल्याने त्यांची शस्त्रक्रिया झाली.
त्या दरम्यानच्या काळात श्रुतीने आपल्या काव्यसंग्रहाचा श्री गणेशा करायचे ठरवले. मग फोनवर बोलताना गव्हाणकर सरांना हे कळाले. त्यांनी लगेच आजारी असताना देखील श्रुतीला गोड संवादी प्रस्तावना दिली. त्यातून त्यांनी आपल्या आशीर्वादाची शिदोरी कायमस्वरूपी श्रुतीला देऊ केली.
अशी ही श्रुती रसाळ साहित्य व निवेदन क्षेत्रात सर्वगुणसंपन्न आहे. तिने विविध वैचारिक ललित लेख, श्रेष्ठ व्यक्तींच्या मुलाखती लिहिल्या आहेत.
त्याचबरोबर लीडर या कादंबरीकरता तिने रेखाचित्रण केले आहे. विविध प्रकारच्या कार्यक्रमात श्रुती सहभागी होते. अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींच्या तिने मुलाखती ऐकल्या आहेत. स्वतः ती निवेदन देखील करते. पुस्तक वाचन हा तिच्या आवडीचा विषय आहे. त्याचप्रमाणे ती नाटकाची समीक्षक आहे. अतिशय उत्कृष्ट नाट्यप्रयोग तिने पाहिले आहेत. कविता वाचनात श्रुती जास्त रमते. कविवर्य अशोक बागवे यांच्या एका कार्यक्रमात ती मला भेटली. त्यानंतर तिचे साहित्य जीवन मला भावले. हल्ल्याची तरुण मुले साहित्य क्षेत्रात रमत नाहीत. अशावेळी श्रुती रसाळ ही युवती साहित्य क्षेत्रात प्रतिभेने काम करते. त्यामुळे श्रुतीच्या पुढील वाटचालीला मनःपूर्वक शुभेच्छा. “पापणीच्या पंखाखाली” काव्यसंग्रह, मूल्य 225 ₹ डिंपल प्रकाशन,
जरूर संपर्क साधा.
मुलाखत शब्दांकन
अॅड रुपेश पवार
9930852165
