*संतांनी समाजाला विवेकवाद शिकवला- राजेंद्र घावटे*
संभाजीनगर (चिंचवड) :
“संतांनी आपाल्या विचारांनी नांगरलेल्या भूमीत आपण राहतो, हे आपले परम भाग्य आहे. अन्याय, अनीती, अधर्म, अनाचार यांवर मात करण्याची प्रेरणा संतसाहित्यातून आपल्याला मिळते. मनामनात साठलेली अविवेकाची काजळी दूर केल्यास समाज विवेकशील बनतो. विवेकशील समाजालाच सुदृढ समाज म्हटले पाहिजे. ज्ञानेश्वर , तुकाराम, एकनाथ, नामदेव आदी संतांनी उत्तम जगण्याचा मार्ग दाखविला , तो आजच्या काळातही दिशादर्शक आहे. संतांनी समाजाला विवेकवाद शिकवला…” असे प्रतिपादन जेष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी केले आहे.
चिंचवड च्या संभाजीनगर येथील श्री दत्त मंदिरामध्ये गुरुदत्त सेवा मंडळाच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ते बोलत होते.
ज्ञानेश्वरी च्या चौथ्या अध्यायातील “मी अविवेकाची काजळी।
फेडोनी विवेक दीप उजळी॥
ते योगिया पाहे दिवाळी॥
निरंतर॥ ” या ओवीची मध्यवर्ती कल्पना घेऊन ह.भ.प. घावटे यांनी प्रवचन सेवा सादर केली.
याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष शामकांत मोरे, दिलीप सावंत, अभिमन्यू भारसाकडे, दीपक पालांडे, आनंद देसाई, तुकाराम घारे, मुरलीधर वाघ, विजय जाधव आदींची प्रमुख उपास्थिती होती.
घावटे पुढे म्हणाले की, “बदलत्या काळाची आव्हाने ओळखून आचारशील आणि विचारशील पिढ्या निर्माण झाल्या पाहिजेत. त्यासाठी भागवत धर्माच्या मार्गाने जावे लागेल. ग्रंथराज ज्ञानेश्वरी मधील प्रत्येक ओवी जगण्याची प्रेरणा देते. लालित्यपूर्ण , कोमल, सात्विक आणि रसाळ भाषेचा आविष्कार आपल्याला ज्ञानेश्वरी मध्ये दिसून येतो. प्रत्येक ओवीचा भावार्थ समजावून घेणे आणि त्यातून बोध घेणे ही अव्याहत प्रक्रिया आहे… संतांच्या विचारांचा जागर पिढ्यांनपिढ्या सुरू आहे . यापूढेही सुरू ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. समाजाच्या जडण घडणीसाठी ते आवश्यक आहे. केवळ मंदिरे निर्माण करण्यापेक्षा संतसाहित्यातून समाजाचे प्रबोधन घडवून आणणारी समाज मंदिरे निर्माण होणे गरजेचे आहे.”
आभारप्रदर्शन अभिमन्यू भारसाकडे यांनी केले.

