जिल्हा ग्राहक तक्रार निवारण समितीची बैठक संपन्न
ग्राहकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडवा – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण समितीची बैठक जिल्हाधिकारी तथा समितीच्या अध्यक्ष तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. या बैठकीत अशासकीय सदस्यांनी ग्राहकांच्या विविध तक्रारीं मांडल्या. या तक्रारींचा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सविस्तर आढावा घेऊन त्यांचे तात्काळ निवारण करण्याबाबत संबंधित विभागांना स्पष्ट सूचना दिल्या.
एमएसईबीने ग्राहकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडवून जनतेशी सातत्याने सुसंवाद साधावा. तसेच नागरिकांच्या तक्रारींना लेखी स्वरुपात उत्तर द्यावे. जिल्ह्यातील अनेक भागांत बीएसएनएल या दूरसंचार कंपनीची सेवा मिळत नसल्याने स्वस्त धान्य दुकानदारांना काम करताना अडचणी निर्माण होत असतात. बीएसएनएलने नेटवर्क समस्या तात्काळ सोडवावी. बस स्थानकांवर प्रवाशांना सुविधा मिळणे आवश्यक आहे. स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्यावे, शौचालयांची नियमित स्वच्छता करावी. ग्राहक हे अर्थव्यवस्थेचे केंद्रबिंदू आहेत. त्यांच्या तक्रारींना गांभीर्याने घेऊन वेळेत निवारण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. शासनाच्या धोरणानुसार ग्राहक हक्कांचे रक्षण करणे ही प्रत्येक विभागाची जबाबदारी असल्याचेही जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी यावेळी संबंधित विभाग प्रमुखांना सूचित केले.
या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे, अरविंद वनमोरे, मिलिंद पावसकर, ज्ञानेश्वर बडे, तसेच अशासकीय सदस्य दयानंद चौधरी, प्रा. सुभाष गोवेकर, आनंद मेस्त्री, विष्णूप्रसाद दळवी, प्रा. सुभाश बांभुळकर आणि प्रा. सुरेश पाटील, तसेच अन्न व औषध प्रशासन, वीज वितरण कंपनी, दूरसंचार, पोलिस प्रशासन, परिवहन विभाग तसेच इतर संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
