You are currently viewing आम. दिपक केसरकरांचा करिष्मा दिसणार की, कमळ फुलणार..?

आम. दिपक केसरकरांचा करिष्मा दिसणार की, कमळ फुलणार..?

 

सावंतवाडी शहरावर गेली अनेक वर्षे दीपक केसरकर यांच्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती परंतु मागील एक दशक दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीला रामराम करून शिवसेनेत प्रवेश केला आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेली सावंतवाडी दुभंगली गेली. शिवसेनेचा भगवा सावंतवाडी मतदारसंघावर नव्याने फडकू लागला. शिवसेनेच्या माध्यमातून दीपक केसरकर यांनी दोन वेळा मंत्रिपद भोगलं परंतु राष्ट्रवादीमध्ये असताना सावंतवाडी शहरातील एक गठ्ठा असलेली मुस्लिम ख्रिश्चन आधी मते मोठ्या प्रमाणावर दीपक केसरकर यांच्या पक्षापासून दुरावली गेली. दीपक केसरकर तब्बल चार वेळा आमदार झाले. पैकी तीन वेळा शिवसेनेचे आमदार म्हणून ते निवडून आले, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मात्र दीपक केसरकर यांना सावंतवाडीची सत्ता अबाधित राखता आली नाही. कुठेतरी सत्ता परिवर्तन होण्यासाठी दीपक केसरकर यांच्या पाठीशी असलेली मुस्लिम आणि ख्रिश्चन मते यांचे विभाजन देखील कारणीभूत ठरले आहे.

जवळपास २३ वर्षे सावंतवाडी नगरपालिकेवर असलेले दीपक केसरकर यांचे वर्चस्व प्रथमच खालसा झाले आणि त्यांचे खंदे समर्थक असलेले प्रेमानंद उर्फ बबन साळगावकर यांचे बंड हे देखील काही प्रमाणात केसरकर यांची शहरात पिछेहाट होण्यास कारणीभूत ठरले. त्याचबरोबर राज्यात सत्तेत असून देखील कार्यकर्त्यांची केसरकरंकडून न झालेली कामे रखडलेला मतदार संघातील विकास यामुळे केसरकर काहीसे बॅकफूटवर आले होते याचाच फायदा घेत भाजपाने सावंतवाडी मतदार संघावर आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सावंतवाडी मतदारसंघावर भाजप आपले कमळ फुलवितो असे वाटत असतानाच निलेश राणे यांनी कुडाळ मतदार संघातून विधानसभेची उमेदवारी दाखल करण्याकरिता शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आणि त्याच्या मागोमाग त्यांचे खंदे समर्थक सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी देखील भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचा रस्ता धरला.याचाच परिणाम असा झाला की,सावंतवाडी मतदार संघात भाजप पुन्हा एकदा बॅकफूटवर गेली आणि शिंदे शिवसेनेने आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली. त्यामुळे भाजपाकडे सावंतवाडी मतदारसंघात खंबीर असे नेतृत्व उरले नाही. संजू परब यांच्या शिवसेना प्रवेशामुळे दीपक केसरकर यांना देखील मतदार संघात झोकून देऊन काम करणारा कार्यकर्ता मिळाला आणि शिवसेनेची गौडदोड यशाच्या दिशेने होऊ लागली.

सावंतवाडी नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आणि सावंतवाडी शहरासाठी भाजपा नगराध्यक्ष पदावर विराजमान होणारा आश्वासक चेहरा शोधत असतानाच सावंतवाडी संस्थांच्या राजघराण्यातील युवराजनी सौ. श्रद्धाराजे भोसले यांची भारतीय जनता पक्षाकडून राजकीय एन्ट्री झाली. सावंतवाडी नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पदावर श्रद्धाराजे भोसले यांना उमेदवारी मिळाली. परंतु संजू परब यांच्या भाजप सोडल्यानंतर निर्माण झालेली पोकळी श्रद्धाराजे भोसले भरून काढतील का..? आणि भाजपचा यशाच्या दिशेने उधळलेला वारू त्याच जोमाने मतदार संघात पुन्हा हाकतील का..? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत…

समाजवाद्यांच्या मुशीत तयार झालेल्या माजी आमदार जयानंद मठकर यांच्या सूनबाई सौ.सीमा मठकर यांनी शिवसेना उबाठा गटात प्रवेश करून शिवसेनेकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळवली. सावंतवाडीच्या गांधी चौकात असलेला स्वतःचा व्यवसाय सतत कार्यक्षम आणि समाजसेवेची आवड, हरहुन्नरी स्वभाव, माणसे जोडण्याची कला व बाजारपेठेत सर्वांच्याच परिचयाचा, ओळखीचा असलेला चेहरा यामुळे त्यांची बाजू जमेची होती. परंतु महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने आघाडीत बिघाडी करत महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी या काँग्रेस उमेदवार म्हणून नगराध्यक्षांच्या निवडणुकीत उतरल्या. ज्याप्रमाणे समाजवाद्यांची आणि उबाठाची फिक्स मते आहेत तशीच काँग्रेसची सुद्धा कट्टर मते आहेत. या दोघांच्या मतविभागणीचा फायदा कोणाला होईल हे आजच्या घडीला सांगणे कठीण असले तरी आघाडीतील बिघाडी तिसऱ्याच्या पथ्यावर पडणार हे निश्चित..!

भाजपशी दुसऱ्यांदा बंडखोरी करून भाजपाच्या माजी उपनगराध्यक्ष सौ अन्नपूर्णा कोरगावकर नगराध्यक्षपदाची अपक्ष उमेदवारी दाखल करून आपले नशीब आजमावत आहेत. यापूर्वी देखील त्यांनी बंडखोरी करून नगरसेवक पदाची निवडणूक लढवून एकहाती विजय मिळवला होता. आणि त्याच्या नशिबाने त्यांना उपनगराध्यक्ष पदावर विराजमान होण्याची संधी मिळाली होती. एक उद्योजक महिला म्हणून त्यांची ओळख असून त्यांनी आयटी क्षेत्रातील कंपनी सावंतवाडी सारख्या शहरात सुरू करून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला, बेकारांच्या हाताला काम दिले. कृषी उत्पादने, कृषी अवजारे जी जिल्ह्यात उपलब्ध होत नव्हती ती सावंतवाडीत आणून शेतकऱ्यांची सोय करून दिली. त्यामुळे त्यांच्याकडे आशावादी दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. तरीही सावंतवाडी शहरातील नागरिक अपक्ष उमेदवाराला किती साथ देतात यावर त्यांचा विजयाचा रथ धावणार की नाही हे निश्चित होईल.

एक वेळ होती, दिपक केसरकर यांनी दगड जरी उभा केला तरी निवडून येत होता. परंतु आज तशी परिस्थिती राहिली नाही. यावेळी केसरकर शिवसेना हा युतीचा घटक पक्ष असल्याने महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. परंतु जिल्ह्यात असलेले भाजपचे नेते लोकप्रतिनिधी मात्र स्वतंत्र निवडणुकीवर ठाम होते. परिणामी आम.दिपक केसरकर यांनी शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा असलेल्या ॲड.नीता सावंत कविटकर यांना उमेदवारी दिली. शिवसेनेच्या गोटात ओळखीचा चेहरा वाटला किंवा केसरकरांसोबत राजकारणात सक्रिय चेहरा असला तरी दिपक केसरकरांचा हा नगराध्यक्षपदाचा काहीसा अनोळखी परंतु शहरातच लहानाचा मोठा झालेला चेहरा लोकांनी न स्वीकारल्यास त्याचा फटका शिंदे शिवसेनेला बसतो की, आम. दिपक केसरकर आपला करिष्मा दाखवतात येणाऱ्या ३ डिसेंबर रोजीच कळून येईल…

प्रतिक्रिया व्यक्त करा