*इतिहासाबद्दल आत्मीयता कमी होत आहे!*
*चौथे इंद्रायणी साहित्य संमेलन*
पिंपरी
‘इतिहासाबद्दल आत्मीयता कमी होत आहे!’ अशी खंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर साहित्यनगरी, जयगणेश बॅंक्वेट हॉल, नवीन देहू – आळंदी रस्ता, मोशी येथे रविवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे सांस्कृतिक योगदान’
या परिसंवादात व्यक्त करण्यात आली. इंद्रायणी साहित्य परिषद आयोजित चौथ्या इंद्रायणी साहित्य संमेलनात इंदूर येथील होळकर राजघराण्याचे विद्यमान वंशज भूषणसिंहराजे होळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या परिसंवादात अभ्यासक डॉ. आम्रपाली कोकरे, प्रा. रूपाली अवचरे, इतिहास अभ्यासक ॲड. प्रणव पाटील सहभागी झाले होते. संमेलनाध्यक्षा डॉ. सीमा काळभोर, स्वागताध्यक्ष नीलेश बोराटे, इंद्रायणी साहित्य परिषदेचे संस्थापक अरुण बोऱ्हाडे, परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. रूपाली अवचरे यांनी अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट कथन करीत, ‘त्यांची धर्मश्रद्धा ही अंधश्रद्धा नव्हती!’ असे मत व्यक्त केले. ॲड. प्रणव पाटील यांनी अहिल्यादेवी आणि होळकर घराण्यातील अज्ञात इतिहासाबद्दल अनेक रंजक बाबी सांगत, ‘अहिल्यादेवी यांची राजकीय सत्ता संपली असलीतरी त्यांची सांस्कृतिक शक्ती अजूनही चैतन्यदायी आहे!’ असे विधान केले. डॉ. आम्रपाली कोकरे यांनी, अहिल्यादेवी यांनी आपल्या रयतेसाठी केलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत, ‘त्यांच्या सांस्कृतिक कार्याचा नंदादीप अजूनही तेवत आहे!’ असे गौरवोद्गार काढले. भूषणसिंहराजे होळकर यांनी परिसंवादातील अध्यक्षीय मनोगतातून, ‘गतकाळातील सर्वच महापुरुषांचे योगदान विस्मरणात जात असताना या परिसंवादाचे महत्त्व अधोरेखित होते. महापुरुषांचा इतिहास लिहिताना पूर्वग्रह बाजूला ठेवले पाहिजेत. माझे पणजोबा कविता लिहीत तसेच त्यांनी ‘वीरध्वज’ हे नाटक लिहिले होते. चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्याशी त्यांचा संपर्क होता. अहिल्यादेवी यांनी मोगल शासन असलेल्या प्रांतात हिंदू मंदिरे उभारली, प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार केला. यावरून त्यांचे परराष्ट्र धोरण किती प्रबळ होते, याची कल्पना यावी. अनेक चित्रपटांमध्ये मात्र राजेरजवाडे यांचे विपर्यस्त चित्रण केले जाते. वास्तविक आपली भाषा, संस्कृती आणि इतिहास आपणच जपला पाहिजे!’ असे प्रतिपादन केले. मीनल साकोरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. पौर्णिमा कोल्हे यांनी आभार मानले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
