You are currently viewing प्रतिभेचे प्रांजळी स्पर्श

प्रतिभेचे प्रांजळी स्पर्श

*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम लेख*

 

*प्रतिभेचे प्रांजळी स्पर्श*

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

मी तसा पौगंडावस्थेपासून लिहू लागलो आहे असे आठवते. तसे माझ्या अगदी बालपणापासून जन्मदात्यांसह अनेक आदर्श व्यक्तींचा सहवास मला भाग्याने लाभला ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जीवनात उत्तम असा संस्कारक्षम सहवास, मार्गदर्शन लाभणं हे फार मोठे दैवदान असते.

प्रत्येक मानवी जीवन म्हणजे संचिती प्रारब्धयोग असलेला जन्ममृत्यूचा सुंदर प्रवास आहे. तो विधिलिखित असून असून प्रत्येकाला करावाचा लागतो आणि स्वतःला प्रामाणिकपणे सिद्ध करावे लागते.

*विवेकी संस्कारक्षम जीवन हे आपल्या अंतरात्म्याला* कृतार्थेची जाणीव करून देते. प्रत्येक व्यक्तीचा आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असला तरी जीवनात मनीची अपेक्षित सुखदा प्राप्त व्हावी हिच एक प्रत्येक मानवाची राजहंसी प्रवृत्ती असते आणि हे वास्तव आहे..!!

*तसं पाहिलं तर विवेकी सत्शील सकारात्मक दृष्टिकोन हिच एकमेव आत्मसमाधानाची गुरुकिल्ली आहे.*

व्यक्त होणे , जीवनाचा सत्यार्थ शोधणे आणि वास्तवानुभूतीतून अंतर्मुख होवून उत्तम सहवास, संस्कार , चिंतन, मनन, यातून वैश्विक समृद्ध साहित्य , कलाकृती यांची निर्मिती झाली आहे याची जाणीव होते. याची सत्य प्रचिती विश्वातील प्रबोधनात्मक धर्मग्रंथ , संतसाहित्य , कथा, कादंबऱ्या , कविता आत्मचरित्रे , अशा विविध लेखनातून आपल्याला जाणवते. ही एक विलक्षण वैचारिक अशी साहित्य संपदा असून जगण्याचा अर्थ समजावून सांगते . *शब्दभावनांचा आत्मसंवाद हाच खऱ्या अर्थानं प्रतिभावंती सारस्वतांची प्रतिभा असते.*

अन तीच *प्रतिबिंबित पारदर्शकता सत्यत्वाचा निर्मिली मूलाधार असतो. तिथेच खरी निर्मोही मनःशांती असते. आणि तिथेच सचैल सात्विक सद्गुणांना भरती येते.*

*आणि मानवी जीवनाची अथांगता अंतराला जाणवते आणि जीवनाचा गूढ अर्थ उलगडतो आणि अंतर्मुखतेची प्रत्यंच्या ताणली जाते अन् भगवंताचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू होतो . हा मोठा विषय आहे.*

 

*पण एक निश्चित तो जो कोणी अतर्क्य , अनामिक आहे की जो ही सृष्टी चालवितो तो एक ब्रह्मस्वरूपी भगवंत असावा हे मात्र निश्चित..!*

 

इथे श्रद्धा फार महत्वाची आहे . याचा उहापोह हा अनादिकालीन अनेक प्राचीन धर्मग्रंथातून , वांग्मयातून झालेला आहे. असे मला वाटते. ते सर्वच धर्मग्रंथ , धर्मशास्त्र , संतसाहित्य हे शिरोधार्य आहेत. म्हणून त्याची प्रवचने ,पारायणे होत असतात आणि त्यातूनच श्रद्धेय भावभक्तीची प्रचिती येते. कलियुगातील प्रबोधनात्मक कीर्तने , प्रवचने , ग्रंथांची सामुदायिक पारायणे , अनेक धार्मिक सण ,उत्सव , वैष्णवी वारी आणि त्यांची अखंडित परंपरा मनाला आत्ममुख केल्याशिवाय रहात नाहीत आणि यातूनच वैचारिक साहित्य निर्मिती , कलानिर्मिती होत असते आणि त्यातूनच वैचारिक मौलिक तत्वज्ञानाची मूलतत्वे उद्घृत होत असावीत असे मला वाटते.

 

*प्रारब्धाचे भोग भोगत असताना सर्वांती कळून चुकतं की खरे समाधान तर मनःशांतीत आहे हे जेंव्हा कळते तेंव्हा तीच मनःशांती शोधण्याच प्रयत्न प्रत्येकजण करीत असतो. त्यावेळीं या भौतिक सुखाचा मोह जीवनात उरत नाही. आपण आजवर सत्यसुख सोडून मृगजळा मागे किती व्यर्थ धावलो याचीच प्रकर्षाने जाणीव होते.*

अशी जेंव्हा मानसिक अवस्था होते तेंव्हा मन विकल होते . *संध्याछाया भिववू लागतात हे मात्र खरे..!*

*मोहमायेपासुन मुक्त होवून मुक्तीची आस लागते आणि एकांत हवाहवासा वाटतो.*जीवनाचा प्रांजळ लेखाजोखा नेत्री तरळतो हे वास्तव आहे…!!*

 

*अस्ताचलाची चाहूल लागते , सूर्यास्त होत आहे कळून चुकते , तिन्हीसांजेचा मंद मनगाभारा सजला आहे आणि गोधुलिकच्या अगतिक पाऊलांचा घुंगरनाद आता ऐकू येवू लागलाय असे वाटू लागते हे मात्र खरं.!*

*असं असून देखील स्मरत राहते ती ब्रह्ममुहुर्ताची सुरम्य मनपावित्र्याची सात्विक किलबिल , राऊळातील प्रसन्नतेचे मंगलमयी प्रासादिक काकडआर्त्यांनी भारलेलं भक्तिपूर्ण चैतन्यपर्व..!!*

 

*जन्मदात्यांच्या वात्सल्य संस्कारांचा परिपूर्ण सुलक्षणी अभिषेक..! आणि पवित्र आत्म्याच्या निष्पाप हुंकाराचे अनामिक निरागस सत्यार्थी स्पर्शाचे अस्तित्व….!!*

 

आता मात्र जीवात्मा सत्याच्या शोधात व्याकुळ होतो…आहे..निःशब्द.. होतो आहे. संवेदनशील होतो आहे .. अन जगलेला प्रत्येक क्षणक्षण आठवत राहतो आहे.

 

*तसं पाहिलं तर आजच वास्तव आणि हरविलेल्या आयुष्याचा लेखाजोखा आज कुठल्या जाणीव शब्दभावनात व्यक्त करावा ? आणि तोही कां ? करावा हा ही यक्ष प्रश्न आज अंतरात्म्याला भेडसावत रहातो हेही तितकच खरं..!!*

पण जे जे घडलं ते सत्य लिहावसं वाटतं आहे. हेही तितकच खरं म्हणावं लागेल..

जगलेल्या आयुष्याचं सिंहावलोकन म्हणजे आपल्या जीवनातील घटनांच प्रतिबिंब *( Kaleidoscope)* अगदी प्रांजळपणाने व्यक्त करणं हे एक आव्हानच म्हणावं लागेल. माणूस कुठलीही गोष्ट , घटना विसरू शकत नाही. कळतंय अशा वयापासून म्हणजे अगदी शिशु , शैशव, पौंगंड ,तारुण्य, प्रौढत्व आणि वृद्धत्व या साऱ्या अवस्थेत स्मृति जागृत असतातच.

आतातर या वयात तसा बऱ्यापैकी निवांतपणा आपल्या वाट्याला येत असतो आणि अत्यंत सतर्कपणे व्यक्त व्हावं असं वाटतं राहतं..!!

सृष्टीतील साऱ्याच मानवी भावसंवेनांचे अनेक कंगोरे असतात त्याची जाणीव प्रत्येक हृदयाला होत असते. सुसंस्कृत मानवी जन्म हा सार्थकी लागलाच पाहिजे तरच जन्म कृतार्थ होतो. जगणे तर अनिवार्य असतेच पण जगताना स्वानुभवातून काहीतरी प्रबोधनात्मक करता आले तर करत रहावे.

*भगवंताने सढळ मुक्त हस्ते मानवाला विवेक बुद्धी दिलेली आहे.तिचा उपयोग जर आपल्याला निस्वार्थी पणे करता आला तर जरूर करावा.*

आपण सर्वसामान्य माणूस किमान वास्तवाचे भान ठेवून व्यक्त तरी होवु शकतो. म्हणून लेखन / कला /काव्य म्हणजे एक विचार असतो तो फक्त आपण जमेल तसे मांडत रहावे असे मला वाटते .

*सुदैवाने मला अनेक ज्येष्ठवृंद प्रभृतींचा ,महानुभवांचा सहवास लाभला त्यांचा स्पर्श झाला आहे. आपल्यासारखे ज्येष्ठ विचारवंत मित्र मला भेटले त्यामुळे मी थोडे बहुत लिहित राहिलो आहे.*

 

*लिहिण , बोलणं , समजून घेणं हा मनाला सात्विक समाधान देणारा अंतर्मुख करणारा एक सहज सुंदर छंद आहे. एवढंच नाही तर कुठलाही सात्विक छंद हा मनाला आनंदच देत असतो .मुळात माणसाचं जीवन कलासक्त आहेच आणि माणसानं कलासक्त असलंच पाहिजे कारण ही कलासक्तता ही जीवनाला सर्वार्थान समृद्ध करते आणि मानवी जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगण्यास मदत करते. त्यातून एक विलक्षण स्वानंद निर्मिती होत असते की जीवन जगणं कृतार्थ करते आणि अवीट परमानंदी अनुभूती येते. असे मला वाटते.*

 

*चौसष्ठ कलांचा उल्लेख प्राचीन पुराणात झालेला आहे तो सर्वश्रुत आहे. ते गणरायाचे अधिष्ठान आहे.*

 

*कला हे कलाकाराचे विनासक्त* *तृप्त समाधानी जगणे असते . *आणि त्यातच भौतिक क्षणिक सुखसौख्याच्याही पल्याड असणारा *ब्रम्हस्वरूप निरागस आनंद असतो!*

त्रैलोक्यातील अंशात्मक अणुरेणु देखील कलासक्त व्यक्तिमत्वाची ऊर्जा म्हणजे प्रेरणादायी चैतन्यस्त्रोत आहेत.

ज्या अनामिक शक्तिने ही विविधांगी , विलक्षण जीवसृष्टि निर्माण केली तो तर एक महान कलाकारच आहे असेच म्हणावे लागेल . त्याने चराचरातील प्रत्येक आत्म्याला सर्वार्थ सुंदरतेने नटवून अतर्क्य अशी किमया केलेली आहे.

सर्वच जीवात्म्याचे रंग , रूप , प्रेम भावनां , सुख , दुःख , विरह , आनंद , स्वार्थ , क्रोध , अशा साऱ्या संवेदनांच्या छटा निर्माण करून कलासक्त जीवाला भावनात्मक अशा वैश्विक साहित्य , सर्वच कलाकृती म्हणजे संस्कृतीला अनुसरुन कलानिर्मिती साठी केलेले एक प्रकारचे आव्हानच आहे..

म्हणूनच त्या आव्हानांना सामोरे जावून किंवा ते आव्हान विवेकाने पेलून प्रांजळ कलाकृती निर्माण करून भावनाविष्कारांना न्याय देणारा *कलासक्त कलाकार* मग तो कुठल्याही क्षेत्रातील असो तो सर्वसामान्य माणसापेक्षा निश्चितच वेगळा आहे. हे निर्विवाद ..!!

*भाग्यवंत आहे..!!*

कुठलीही कला ही आत्मिक आनंद देते. त्या आनंदाची तुलना या जगातील कुठल्याच मौजमापदंडांनी कधीच करता येत नसते. हे वास्तव आहे.

*गर्भातुन नैसर्गिक प्रसवणारा जीवात्मा आणि त्यातून प्राप्त होणारा सात्विक मातृत्वी , पितृत्वी वात्सल्यप्रीतानंद जो आहे तो अवर्णनीय , शब्दातीत आहे हे निर्विवाद..!!*

*तसेच कुठल्याही कलेची उपासना किंवा त्यातील आत्मतादात्म्यातुन* *जन्माला येणारी कलासक्त कलाकाराची उत्कट कलाकृती , साहित्यकृती म्हणजे ब्रह्मानंद आहे.*

*कृपाळू दैवदान आहे..*

*देवकृपा आहे असे मी म्हणेन.*

 

*कला ही साधना , तपश्चर्या आहे.*

*आणि अशा कलेतुन झालेली निर्मिती ही तनमनांतराला मंत्रमुग्ध करणारी असते.*

*म्हणूनच कला हे व्रतस्थ जगणे असून कलाकार साधक आहे.*

*आणि अशा प्रांजळ कलासक्त कला साधनेची स्वानुभुती म्हणजे आत्मिक मोक्षमुक्ती लाभणारी जीवनाची सुखद सांगता आहे.*

आणि म्हणूनच भौतिक कोलाहलात देखील त्या कृपाळू मुरलीमनोहराच्या मुग्ध पावरीचे मधुर स्वर चित्ताला वात्सल्यतेने कुरवाळत रहातात. आणि निर्व्याज कलासक्त जीवनाचा अर्थ उलगड़तो , प्रत्ययास येतो..

म्हणूनच असा *वैश्विक कलासक्त*, वैचारिक साहित्यिक जीवनाचा ध्यास असणे , लाभणे हे जन्मोजन्मीचे तृप्त कृतार्थी संचित आहे. ते आपण साहित्यिकांनी , कलाकारांनी अंतिम श्वासापर्यंत जपत रहावे..!!!

*इती लेखन सीमा…*

******************

*वि.ग सातपुते*

*अध्यक्ष : महाकवि कालिदास प्रतिष्ठान.*

*पुणे , मुंबई , ठाणे , मराठवाड़ा* ( महाराष्ट्र)

*📞(9766544908 )*

प्रतिक्रिया व्यक्त करा