रूजुल पाटणकर–नीलम नाईक यांच्या प्रचाराला मिळाला पालकमंत्र्यांचा जोरदार पाठिंबा
सावंतवाडी :
सावंतवाडीत भाजपच्या प्रभाग ९ मधील उमेदवार रूजुल पाटणकर आणि नीलम नाईक यांच्या विजयासाठी खुद्द पालकमंत्री नितेश राणे स्वतः रणांगणात उतरल्याने या प्रभागातील निवडणूक अधिक रंगतदार बनली आहे. नगराध्यक्ष श्रद्धा भोसलें यांच्यासह भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करून या नगरपालिकेत भगव्याचा विजयफलक फडकवूया, असे ठाम आवाहन राणे यांनी मतदारांना केले.
राणे यांनी प्रभागात आयोजित कोपरा बैठकीत मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांशी थेट संवाद साधत आगामी विकासकामांची हमी दिली. “जनतेचा विश्वास राखणे ही आमची प्राथमिकता आहे. तुम्हाला हवा असलेला खरा विकास आम्ही करून दाखवू,” असे आश्वासन त्यांनी दिले.
प्रभागातील दोन्ही उमेदवारांचे चारित्र्य, शैक्षणिक पात्रता आणि काम करण्याची उमेद ही या भागाच्या प्रगतीसाठी निश्चितच महत्त्वाची ठरेल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.
“काहीही झाले तरी सावंतवाडीत भाजपलाच निश्चित विजय मिळणार,” असे सांगत राणे यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवीन उर्जा ओतली.
या प्रचारसभेला सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसलें, माजी सभापती प्रमोद कामत तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
