“जनतेने साथ दिली तर पुढील २५ वर्षांचे भविष्य बदलू” – पालकमंत्री नितेश राणे
भाजप उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन; शहराच्या पायाभूत सुविधांपासून शिक्षण, पर्यटनापर्यंत विकासकामांचा आढावा
स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, नाट्यगृह, भाजी मार्केट, नवी वसाहत – कणकवलीचा चेहरामोहरा बदलण्याची तयारी
कणकवली :
कणकवली शहराला अधिक आधुनिक, नियोजनबद्ध आणि सर्वसमावेशक बनवण्याचा संकल्प नव्या निवडणुकीत भाजपने मांडला असून, ही निवडणूक कणकवलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी निर्णायक ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
“पाच वर्षांपूर्वी मी आमदार होतो, आज तुमचा आमदार कॅबिनेटमंत्री आहे. त्यामुळे कणकवलीच्या विकासासाठी निर्णयक्षम पातळीवर आम्हाला मोठी ताकद मिळाली आहे,” असे ते म्हणाले. ते कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे आणि नगरसेवक पॅनल यांच्या प्रचारार्थ आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
नितेश राणे यांनी सांगितले की, मागील ५ वर्षांत घेतलेल्या विकासकामांमुळे कणकवलीचा चेहरामोहरा बदलला आहे. रिंगरोडचे जाळे, जाणवली नदीवरील पूल, वाढलेली रहदारी आणि वस्ती, पर्यटनस्थळांना जोडणारे मार्ग यामुळे कणकवली आणखी जवळ आले असून व्यापारी व्यवहार दुपटीने वाढल्याचे त्यांनी सांगितले.
कणकवलीमध्ये दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था व्हावी म्हणून स्थापन झालेल्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचा उल्लेख करताना ते म्हणाले की, “आज अनेक पालक आपली मुले शहराबाहेर न पाठवता कणकवलीतच गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत.” त्याचबरोबर, १० कोटींचे नवे नाट्यगृह, मराठा मंडळाचे नवे भवन, बारामही धबधब्याला मिळालेली पर्यटन ओळख, हे कणकवलीच्या सर्वांगीण विकासाचे घटक असल्याचे ते म्हणाले.
पटवर्धन चौकातील जुन्या भाजी मार्केटच्या जागी, बेसमेंट पार्किंगसह भव्य भाजी मार्केट उभारण्याचा निर्णय झाला असून, पुढील टप्प्यात स्विमिंग पूल, क्रिकेट ग्राउंड, जॉगिंग ट्रॅकसह सुसज्ज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली.
कोरोनाकाळातील सेवा कार्याची आठवण करताना ते म्हणाले, “त्या कठीण काळात समीर नलावडे आणि नगरसेवकांनी कोविड सेंटर उभारले, गरजूंना कमळ थाळी मोफत दिली. हीच खरी लोकसेवा.”
खाऊ गल्ली, पर्यटन महोत्सव यांसारखे उपक्रम सत्तेच्या बदलत्या परिस्थितीतही सुरू ठेवण्यात भाजपच पुढे असल्याचे त्यांनी नमूद केले. सत्तेच्या काळात नागरी दाखल्यापासून शहरातील शांततेपर्यंत, प्रत्येक प्रश्नावर समीर नलावडे यांनी काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.
“विरोधक टीका करतील, खोटे आरोप करतील, परंतु कणकवलीचा विकास थांबवू देणार नाही. आम्ही विकासाच्या मुद्द्यांवर लढत आहोत,” असे राणे म्हणाले.
“कणकवलीच्या पुढील २५ वर्षांचा विचार करा. शहराला आदर्श बनवायचे असेल तर मजबूत नेतृत्वाला साथ द्या. समीर नलावडे आणि आमच्या नगरसेवकांना निवडून द्या,” असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
