मालवण :
मालवण नगरपालिका निवडणुकीत आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस ठरला आणि तब्बल सहा अपक्ष उमेदवारांनी स्पर्धेतून बाजूला होत राजकीय वातावरणाला नवीन वळण दिले. एकूण ६७ उमेदवारी अर्जांपैकी या सहा जणांच्या माघारीनंतर ६१ उमेदवार आता अंतिम लढाईत उतरले आहेत. नगराध्यक्षपदासाठी भाजपा, शिंदेसेना आणि उद्धव सेना अशी तिरंगी लढत निश्चित झाली आहे.
गेल्या दोन दिवसांत गणेश पाडगावकर, सिद्देश मांजरेकर आणि श्वेता सरमळकर यांनी अर्ज मागे घेतली होते. तर आजच्या निर्णायक दिवशी कॅलीस फर्नांडिस, नितेश पेडणेकर आणि राजेश पारधी यांनी स्पर्धेतून माघार घेत आपापला राजकीय कल स्पष्ट केला. यापैकी कॅलीस फर्नांडिस यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन भाजपला थेट समर्थन जाहीर केले, तर नितेश पेडणेकर यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश करत नवा राजकीय अध्याय सुरू केला.
दरम्यान, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांना भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारीवर ठाम राहत प्रभाग ७ मध्ये चौरंगी लढतीची ठिणगी पेटवली आहे. शहरवासीयांचे विशेष लक्ष या प्रभागाकडे लागले आहे.
भाजप आणि शिंदे सेनेतील संभाव्य युतीबाबत चर्चा सुरू असतानाच अखेर दोन्ही पक्षांनी स्वतंत्र रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे मालवणची निवडणूक आणखी चुरशीची बनली आहे.
