You are currently viewing आधुनिक शिक्षणाकडे एक पाऊल: शंकर गंगाराम इस्वलकर यांच्याकडून तिथवली विद्यामंदिराला संगणक भेट

आधुनिक शिक्षणाकडे एक पाऊल: शंकर गंगाराम इस्वलकर यांच्याकडून तिथवली विद्यामंदिराला संगणक भेट

आधुनिक शिक्षणाकडे एक पाऊल: शंकर गंगाराम इस्वलकर यांच्याकडून तिथवली विद्यामंदिराला संगणक भेट

वैभववाडी:

तिथवली (वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग) येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यामंदिरात ‘मॉडर्न एज्युकेशन एम्पॉवरमेंट अँड रिसर्च असोसिएशन (MEERA)’ संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत, तिथवली गावाचे प्रतिष्ठित नागरिक शंकर गंगाराम इस्वलकर यांनी शाळेला संगणक भेट दिला. या महत्त्वपूर्ण योगदानामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण घेण्यास मदत होणार असून, विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) आणि रोबोटिक्स यांसारख्या विषयांची ओळख त्यांना लहानपणापासूनच होणार आहे.
या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक अंकुश सुतार सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रोहीन कुडाळकर, MEERA असोसिएशनचे अध्यक्ष गुलजार काझी, सचिन इस्वलकर, ओमकार इस्वलकर, शाळेचे शिक्षक सचिन झाटे सर, उर्णे मॅडम आणि सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.
याप्रसंगी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक अंकुश सुतार सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रोहीन कुडाळकर आणि MEERA असोसिएशनचे अध्यक्ष गुलजार काझी यांनी शंकर गंगाराम इस्वलकर आणि सचिन इस्वलकर यांचे विशेष आभार मानले. त्यांच्या या उदार देणगीमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे गिरवण्याची संधी मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
MEERA असोसिएशनचे अध्यक्ष गुलजार काझी यांनी सांगितले की, “या संगणकाच्या मदतीने आम्ही लवकरच शाळेत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि रोबोटिक्सचे प्रशिक्षण सुरू करणार आहोत. यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक कौशल्ये मिळतील.”
या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी मोठा उत्साह दाखवला. संगणक मिळाल्याने ते आता नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून आले. हा उपक्रम छत्रपती शिवाजी विद्यामंदिर तिथवली येथील विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याकडे नेण्यात निश्चितच मदत करेल आणि त्यांना तंत्रज्ञानाच्या युगात यशस्वी होण्यासाठी सक्षम करेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा