वेंगुर्ला / रेडी :
नवसाला पावणारी, कोकणातील अंबाबाई म्हणून प्रसिद्ध असलेली ग्रामदैवत स्वयंभू श्री देवी माऊली रेडी यांचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार, १९ नोव्हेंबर २०२५ (कार्तिक अमावस्या) रोजी भक्तिभावात पार पडणार आहे. यावेळी विशेष आकर्षक फुलांची सजावट व दिव्यांची प्रकाशरचना करण्यात येणार आहे.
या दिवशी सकाळी ६.०० वाजता श्री देवी व परिवार देवतांची पूजा होणार असून सकाळी ८.०० वाजता उत्सव मूर्ती सजावट, ओटी भरणे व नवस फेडण्याचा कार्यक्रम होईल. सकाळी ९.०० नंतर मंदिराच्या सभामंडपात देविच्या साड्यांचा लिलाव होणार आहे.
रात्री ११.३० वाजता संबंधितांना तेल वटप तसेच पुराण वाचन होईल. त्यानंतर रात्री ११.४५ वाजता देवीसमोर कुंभाळा ज्योतीचा विधी आयोजित करण्यात आला आहे.
रात्री १२.०० वाजता फटाक्यांच्या आतषबाजीसह श्री देवीची पालखी प्रदक्षिणा पार पडेल. त्यानंतर वालावलकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
सदर उत्सवासाठी सर्व भाविकांनी उपस्थित राहून देवीचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
