मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
महाराष्ट्राच्या लोककला परंपरेला नवसंजीवनी देणारे महाराष्ट्रशिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतीदिनानिमित्त १५वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह आणि मृदगंध पुरस्कार वितरण सोहळा बुधवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी सायं. ६.०० वा., रवींद्र नाट्यमंदिर येथे भव्य दिव्य पद्धतीने होणार आहे. भारूड, पोवाडे, गोंधळ अशा लोकपरंपरेतील प्रभावी सादरीकरणातून शाहीर उमप यांनी महाराष्ट्राच्या रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.
यंदाच्या ‘मृदगंध पुरस्कार २०२५’ चे मानकरी म्हणून ज्येष्ठ गझलनवाझ भीमराव पांचाळे (जीवनगौरव), राजेंद्र राऊत (लोककला क्षेत्र), प्रदीप शिंदे (शिल्पकला), अभिनेते जयवंत वाडकर (अभिनय क्षेत्र), दिग्दर्शक परेश मोकाशी, अभिनेत्री व निर्माती मधुगंधा कुलकर्णी आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू (नवोन्मेष प्रतिभा – अभिनय) यांची निवड करण्यात आली आहे. शाल, पुष्पगुच्छ, मानपत्र आणि लोकशाहीर विठ्ठल उमपांची प्रतिकृती असलेले मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप राहणार आहे.
विठ्ठल उमप फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदेश वत्सला विठ्ठल उमप म्हणाले, “लोककला ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे. बाबांनी जनसामान्यांशी एक वेगळा ऋणानुबंध निर्माण केला आणि रसिकांनी आम्हालादेखील त्याच प्रेमाने स्वीकारले. समाजसंस्कृतीचा वारसा जपण्याचा आमचा संकल्प कायम राहील,” असे त्यांनी सांगितले. त्यांच्या वक्तव्यात शाहीर उमपांच्या कलापरंपरेविषयीची कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकी जाणवते.
सोहळ्यात पद्मश्री उस्ताद शाहीद परवेझ खान (सतार) आणि लावणी कलावंत रेशमा मुसळे परितेकर (पुणे) यांच्या सादरीकरणातून शाहीर विठ्ठल उमपांना सांगितिक अभिवादन अर्पण होणार आहे. या सादरीकरणामुळे कार्यक्रमाच्या कलात्मक वातावरणाला विशेष उंची प्राप्त होईल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, आय.ए.एस. अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सूत्रसंचालनाची धुरा डॉ. समीरा गुजर सांभाळणार असून रसिकांना प्रवेश विनामूल्य आहे.
२०१२ साली स्थापन झालेल्या विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे शेतकरी, कॅन्सरग्रस्त रुग्ण तसेच शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकारांना सातत्याने मदत केली जाते. कोविड काळात कलाकार, लोककलावंत आणि साहित्यिकांना सहकार्य करण्याची सामाजिक जबाबदारीही फाऊंडेशनने निभावली. कलेची साधना आणि समाजसेवेचा वारसा पुढे नेत नंदेश उमप यांनी वडिलांचे कार्य समर्थपणे पुढे नेले आहे.
