*आनंदीबाई रावराणे महाविद्यालयामध्ये सैन्य, अग्नीवीर व पोलीस भरती प्रशिक्षण शिबिर संपन्न*
वैभववाडी
वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय सैन्य भरती, अग्नीवीर व पोलीस भरतीसाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई स्थानिक समितीचे सचिव प्रमोद रावराणे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वैभववाडी पोलीस ठाणेचे श्री.मोहन कीर्तीराज राणे व सुभेदार साहू,जेसीओ 58 महाराष्ट्र बटालियन हे उपस्थित होते.
श्री.मोहन राणे यांनी पोलीस भरती विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेल्या लेखी परीक्षेची तयारी कशी करायची? त्यासाठी कोणती पुस्तके अभ्यासायची? प्रश्नपत्रिकांचे स्वरूप कसे असते? लेखी परीक्षेसाठी मेरिट किती लागते? व शारीरिक चाचणीची तयारी कशी करायची?याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना सध्या महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यासाठी प्रोत्साहित केले. पंधरा हजार तीनशे जागांची मोठी भरती निघालेली आहे या संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
एनसीसी ऑफिसर सुभेदार साहू यांनी अग्निवीर भरती व सैन्य भरती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. अग्निवीर भरतीसाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी पात्रता, फिजिकल फिटनेस, भरतीची कशी तयारी करावी याविषयी मार्गदर्शन केले. अग्निवीर भरती झाल्यानंतर चार वर्षांमध्ये मिळणारे मानधन, तसेच चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर इतर ठिकाणी मिळणारी नोकरीची संधी याविषयी माहिती दिली. आपल्या स्वअनुभवातून त्यांनी विद्यार्थ्यांना अग्नीवीर व सैन्य भरती मध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले.
कार्यक्रमाचे आयोजक महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था स्थानिक समितीचे सचिव श्री.प्रमोद रावराणे यांनी ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या भरतीसाठी येण्याजाण्याचा खर्च करणे शक्य नसेल, तर त्या सर्व गरजू विद्यार्थ्यांचा प्रवास खर्च करण्याचे आश्वासन देऊन
गरजू विद्यार्थ्यांना भरतीसाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही प्रकारच्या मदतीची तयारी दर्शवली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.डी.एम.सिरसट, पाहुण्यांची ओळख डॉ.अजित दिघे, सूत्रसंचालन प्रा.निलेश कारेकर व आभार प्रदर्शन डॉ.एम.आय.कुंभार यांनी केले. याप्रसंगी आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे स्थानिक समितीचे अध्यक्ष श्री.सज्जन काका रावराणे, प्र.प्राचार्य डॉ.एन.व्ही.गवळी, नगराध्यक्षा सौ.श्रद्धा रावराणे, माजी उपनगराध्यक्ष श्री.संजय सावंत, माजी नगराध्यक्ष- नेहा माईनकर व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, अर्जुन रावराणे विद्यालय, आयटीआय विद्यालय वैभववाडी व आचिर्णे विद्यालय येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
