राजेसाहेब खेमसावंत तिसरे यांच्या स्मरणार्थ धार्मिक विधी आणि दर्शन; दिवसाच भरणारी जिल्ह्यातील अनोखी जत्रा
सावंतवाडी:
सावंतवाडी शहरातील एकमेव जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेली राजघराण्याच्या स्मशानभूमीतील ‘माठ्याची जत्रा उद्या १४ नोव्हेंबर रोजी होत आहे. राजेसाहेब खेमसावंत तिसरे यांच्या माठ्यात सकाळपासून धार्मिक विधी होणार असून दुपार पासून दर्शन सुरु होणार आहे. इतर जत्रा या रात्रीच्या भरतात, ही जत्रा सकाळी भरते. रात्री या जत्रोत्सवाची सांगता होते. शहरासह आजूबाजूच्या गावातील लोक या जत्रोत्सवास आवर्जून येतात. जिल्ह्यातील इतर जत्रा या रात्रभर चालतात. मात्र, ही जत्रा दिवसा भरते. संस्थानच्या वीर वंशजांच स्मरण माठ्याच्या जत्रोत्सवात केल जात. सावंतवाडी शहरात होणारा हा एकमेव आणि ऐतिहासिक जत्रोत्सव आहे.
भारतातील ४८ संस्थानांपैकी एक म्हणजे सावंतवाडी संस्थान. या संस्थानला ४०० वर्षांचा इतिहास आहे.पहिले खेम सावंत यांनी आपल्या शौर्याने आजूबाजूचा प्रदेश आपल्या अंमलाखाली आणत चराठे म्हणजेच आजची सावंतवाडी इथं राजधानीच ठिकाण ठरवून राजवाडा बांधला. तर दुसऱ्या खेम सावंत यांनी शहर वसवले. या संस्थानमध्ये भोसले कुळात अनेक कर्तृत्ववान, पराक्रमी राज्यकर्ते होऊन गेले. इ. स. १७५५ साली रामचंद्र सावंत यांच्या निधनानंतर पुत्र खेम सावंत तथा राजश्री यांना राज्याधिकार मिळाला. राजश्री तिसरे खेम सावंत हे विद्याप्रेमी, विद्येची अभिरुची असलेले एकमेव राजा होते. दानशूर राजा म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांनी अनेक लोकांना, देवस्थानांना जमिनी व रोख रकमा दिल्या होत्या. आज संस्थानात जी इनामे चालू आहे त्यातील बरीच इनामे ही त्यांच्या काळातील आहेत. त्यांच्या काळातील एक उदाहरण म्हणजे प्रसिद्ध देवस्थान श्री देव आत्मेश्वर देवस्थान आहे. हे देवस्थान त्यांच्या कारकीर्दीतील असून मंदीरासमोरील तळीला देखील जाज्वल्य इतिहास आहे.
