कॉंग्रेस-शिवसेना गोटात फुट, भाजपकडून प्रचाराला सुरुवात!
कणकवली :
कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरायच्या चौथ्या दिवशीही एकाही इच्छुक उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे उमेदवारांच्या हाती आता केवळ तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. एक नगराध्यक्ष आणि १७ नगरसेवक पदांसाठी ही निवडणूक होत असून, पहिल्या चार दिवसांत अर्ज न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असून, मतदान २ डिसेंबर रोजी होणार आहे. ऑनलाइन नामनिर्देशन प्रक्रिया सुरू असून, उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी तहसील कार्यालयात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, भाजपकडून प्रचाराची सुरुवात करण्यात आली आहे. मात्र महाविकास आघाडीत मतभेद उफाळले आहेत. काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासह १४ जागांवर स्वतंत्र उमेदवार उभे करण्याची घोषणा झाली आहे, तर शहर विकास आघाडीचा प्रयत्न अपयशी ठरल्याचे दिसत आहे.
भाजपा व शिंदे गटात चर्चेला सुरुवात झाली असली, तरी ठाकरे शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी शिंदे गटासोबत आघाडी करण्यास विरोध दर्शवला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि शहर विकास आघाडी या दोन्ही गटात फूट पडल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

