सीमा मठकर यांचा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल;
महाविकास आघाडीचा विजय निश्चित — विनायक राऊत
सावंतवाडी :
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतर्फे सौ. सीमा मठकर यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दाखल झालेला हा पहिलाच उमेदवारी अर्ज ठरला आहे.
उमेदवार सौ. मठकर यांनी आपला नामनिर्देशन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या कडे दाखल केला.
यावेळी माजी खासदार विनायक राऊत, उबाठा शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी बोलताना विनायक राऊत म्हणाले, “उद्धव ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार सावंतवाडीत नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. स्व. आमदार जयानंद मठकर यांच्या सुनबाई सीमा मठकर यांच्या रूपाने शिवसेनेला एक सशक्त आणि सुसंस्कृत नेतृत्व मिळालं आहे. विजय निश्चित आहे, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”
उमेदवार सौ. सीमा मठकर यांनीही बोलताना सांगितले की, “जनतेचा पाठिंबा आमच्या पाठीशी आहे. नगराध्यक्षपदाबरोबरच आमच्या सर्व नगरसेवक उमेदवारांचा विजय निश्चित आहे. सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
नामनिर्देशनावेळी शिवसैनिकांनी “जय शिवसेना”, “उद्धव ठाकरे यांचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आता रंगात येणार असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.
