You are currently viewing गावची जत्रा

गावची जत्रा

*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार ज्येष्ठ साहित्यिक विनय सौदागर लिखित काकल्याचे तर्कट*

 

*गावची जत्रा*

 

“काय? काल जत्रेक गेल्लंस मां? ” काकल्याने आल्या आल्याच प्रश्न टाकला. मी ‘हो’ म्हणालो. “माका गमाक नाय तो?” काकल्या पुढे सरकला.

“तुला कशाला दिसायला पाहिजे? देवाने बघितलं की झालं.” माझ्या या अनपेक्षित उत्तरावर काकल्या चमकला. हसून म्हणाला,”तसा नाय रे. मी जरा उसराच गेल्लय. आरामात इलय नाटक बघून. तू बेगीन जावन् इल आसतलंस. आसो. ता जाव. जत्रेचो अर्थ काय?”

“यात्रा शब्दाचे ते ग्रामीण रूप असावे.” मी वेळ मारून नेण्यासाठी काहीतरी म्हणालो; पण काकल्याने ऐकून घेतले नाही. त्याने विचारलेच , “गावातल्या गावात ‘यात्रा’कसली?”

“अरे, माहेरवाशीणींसाठी ही यात्रा असेल. कामासाठी गाव सोडून गेलेल्यांसाठी ही यात्रेची सोय असेल.” मी समजावत राहिलो.

” छ्या. म्हंजे तसा आसातय, पून आजूनय काय तरी अर्थ आसतलो. बऽरा. खाजा हाडलंस काय नाय?” काकल्याने विचारलं.

“आता घरी कोण खाजं खात नाहीत.”मी खरं ते सांगितलं.

“मगे हाडलंस काय मंचुरी?” काकल्या खवचट बोलला.

मी बोलत नाही हे पाहून तो पूढे म्हणाला, ” जत्रेत हाली चायनीजचे गाडये दिसतत, आईस्क्रीम आसता. अरे थंडेत गुळाचा खाजा खावचा सोडून लोक चायनीज खातंत आनी खाज्याची पुडी म्हातार्‍यांक होरतत.” काकल्या वैतागत म्हणाला.

काकल्याच्या आत काहीतरी खदखदत होतं. तो बोललाच,

“राती दशावतार बगलय.”

“कसं होतं?” मी विचारलं.

“अरे कोन नाय देवळात. येक वाजता सुरू झाला. फाटेसर दशावत्री आराडतसत् आपले.”

“अरे असं म्हणू नये. या परंपरा आहेत, त्या सांभाळाव्या लागतात.”

यावर काकल्याचाआवाज चढला,”अरे काळ बदाललो, परंपरा बदलवक् नको? पूर्वी लोक तिनसाना जत्रेक इले काय नाटक बगून घराक जायत्. लायट नाय होती ,हुनान उजवाडाची वाट बगूची लागा. आता नाटक आवरूक काय हरकत आसा? चार सोंगा दाखवची नी थांबाचा. बिचार्‍या दशावतारी नटांका आराम तरी मेळात. रोज राती तेंका जागरणां. तेंका वायच् सुशेग मेळलो तर देव पण खूस जायत्.” काकल्या मनापासून बोलला. खरंच, परंपरेला छेद न देताही बदल होऊ शकतो, हे सुचवून तो निघाला. त्याला कळतं ते आम्हाला कधी कळणार?

 

*विनय वामन सौदागर*

आजगाव, सावंतवाडी.

9403088802

प्रतिक्रिया व्यक्त करा