You are currently viewing आंबिये सर वाचन कट्ट्याचा शुभारंभ

आंबिये सर वाचन कट्ट्याचा शुभारंभ

 

आंबिये सर हे पुस्तकप्रेमी होते. त्यांचा स्वतःचा असा पुस्तक संग्रह होता. त्याला ते ‘होम लायब्ररी’ म्हणत. या घरगुती वाचनालयातून त्यानी अनेक वाचक घडवले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी व मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी आजगाव येथे कै. मंगेश अनंत आंबिये सरांच्या नावाने ‘आंबिये सर वाचन कट्टया’ चा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला सरांचे बांदा येथील पुतणे श्री. विवेक आंबिये उपस्थित होते. त्यांचे हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

यानंतर वाचन कट्ट्याचे मार्गदर्शक विनय सौदागर यांनी उपक्रमाची कार्यप्रणाली समजावून सांगितली. “पुस्तके वाचून मुलं त्याची परीक्षणे लिहितील व दर आठवड्याला याचा आढावा घेतला जाईल. मुलांच्या आवडीचा अंदाज घेऊन त्याना विवीध पुस्तके भेट देण्यात येतील. त्यांना एखाद्या वाचनालयाचे सदस्यत्व बहाल करण्यात येईल. मुले स्वतःचा पुस्तक संग्रहही करतील, त्यासाठी आवश्यक ते सहाय्य करणेत येईल”, असे सौदागर यांनी सांगितले.

सर्व मुलांना पुस्तके देण्यात आली. याकामी गुळदुवे येथील ‘ज्ञानदीप वाचनालया’ चे सहाय्य लाभले. मुलांना परीक्षणासाठी वह्याही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

सौदागर कुटुंबिय त्यांच्या वडिलांच्या जन्म शताब्दीनिमित्त दर तीस तारखेला एक उपक्रम राबवतात. हा दुसरा कार्यक्रम होता. त्यांचे तर्फे सर्व मुलांना कॅम्लिन कंपास बाॅक्स भेट देण्यात आल्या.

संचित पांढरे, वैभव पांढरे, गंधार गंवडे, प्रभाकर मोरजकर, रोहित आसोलकर, वेदांत देशमुख, सानिया शेख, मानसी पांचाळ, दिया सावंत, साक्षी सुतार आणि राही पांढरे ही मुले वाचन कट्ट्याची सदस्य झाली, तर अजून ८ मुलांनी नोंदणी केली आहे. बौद्धिक खेळ व त्यानंतर अल्पोपाहार याने कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा