*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे कवी वि ग सातपुते यांच्या काव्याचे लेखक कवी डॉ.विनय पारखी यांनी केलेलं रसग्रहण*
*कधीतरी एकदा बोलनां*
तुझं रोजच अस येणं जाणं
अन हळूचच वळून पहाणं
त्याची सवय झालीय आता
मनभावन तुझ सुंदर दिसणं
तुझी नजर अव्यक्त अबोली
तरीही उमगतं तुझं ते हसणं
तुझ्या प्रेमाची ती मौनी भाषा
समजवी प्रितिचा अर्थ लावणं
प्रीतरंगल्या भावुक कटाक्षी
तनमन होत गं अगदी हळवं
निःशब्दी गूढता मनांतरातील
उमगताना सुखद होतं जगणं
आता कधीतरी बोलना एकदा
ऐकुदे शब्दलाघवी तुझं बोलणं
जरी खेळ सारा हा संचिताचा
या जन्मात होवु दे तुझं भेटणं
काळ हा झरझर सरतोच आहे
आज नकोसे वाटते वाट पाहणं
आता फक्त तुझी गं भेट व्हावी
एवढच एक उरलं आहे मागणं
© वि. ग. सातपुते (भावकवी)
*शब्दांच्या ओंजळी*
सांग सखये तुझ्यासाठी अजूनही
किती वहाव्या शब्दांच्या ओंजळी
मज अजूनही कधीच कळले नाही
मी किती रित्या कराव्या ओंजळी
नित्य छळते तुझे हे मौन जिव्हारी
आतातरी व्यक्त हो या कातरवेळी
हा जन्म एकदा पुढचे ठावूक नाही
तरीही स्मरतो गं तुजला सांजवेळी
सत्य निर्मल प्रीती रांजण सुखाचे
जे ऋणानुनुबंध गतजन्मीचे भाळी
सांग सखये तुझ्यासाठी अजूनही
किती वहाव्या शब्दांच्या ओंजळी
© वि. ग. सातपुते (भावकवी)
प्रेमाची आपण जर ढोबळ मानाने व्याख्या केली तर ती कदाचित अशी असेल:-… प्रेम म्हणजे कोणाबद्धलही आपल्या मनात आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, आदर निर्माण होणे आणि त्या गोष्टीच्या सततच्या सहवासामुळे आपल्या जीवनात भावनिक, मानसिक, शारीरिक आनंद निर्माण व्हावा आणि त्या विषयीचा स्नेह वृद्धिंगत व्हावा म्हणजे प्रेम.
प्रेम कविता हा विषय अनेक कवींनी वेगवेगळ्या पद्धतीने हाताळला आहे. उदा. द्यायची झाल्यास ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ या कवितेत कुसुमाग्रज म्हणतात …
निराशेत सन्यस्थ होऊन बैसे
ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रृव
पिसाटापरी केस पिंजारुनी हा
करी धूमकेतू कधी आर्जव
भावनांचा उत्कट अविष्कार, संवेदनाक्षम मन आणि भावनेत भिजलेला शब्द म्हणजे या वरील ओळी. पृथ्वी सूर्या भोवती फिरते हे सत्य कायम ठेवून त्यांच्या विफल प्रेमाची कहाणी. वास्तविक पाहता पृथ्वी आणि सूर्य यांचे मिलन होणे शक्यच नाही. तरीसुद्धा पृथ्वीसाठी वेडावलेले इतर वेडे प्रेमी जीव असा केलेला कल्पनाविलास. प्रेमाचे स्वप्न पहायचे. क्षणिक का होईना पण तो आनंद, ते समाधान मानायचे आणि तृप्त व्हायचे. थोडक्यात अजाणतेपणी लहान वयात प्रेमाची इच्छा झाल्यामुळे, त्यातून निर्माण झालेली ओढ आणि मग त्यातून झालेला विरह म्हणजे धूमकेतू आणि ध्रुव तारा यांचे उदाहरण.
त्याच प्रमाणे तलवारीशी लगीन लागलेल्या आणि सारे जीवन अग्निदिव्याने भरलेल्या जीवनाने जे क्षण आपल्या झोळीत टाकले आहेत ते क्षण कसे आनंदाने उपभोगायचे या अर्थाची कविता ;…
ध्येय, प्रेम, आशा यांची
होतसे का कधी पूर्ती
वेड्यापरी पूजतो या
आम्ही भंगणाऱ्या मूर्ती!
काढ सखे, गळ्यातील
तुझे चांदण्याचे हात
क्षितिजाच्या पलिकडे
उभे दिवसाचे दूत.
किंवा कविवर्य मंगेश पाडगांवकर यांची कविता ;…
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणी आमचं अगदी ‘सेम’ असतं !
अशा अनेक कवितांची उदाहरणे देता येतील.
परंतु प्रेम हा अत्यंत नाजूक विषय आप्पांनि अत्यंत कुशलतेने हाताळला आहे. हे भावनिक गीत वाचल्यावर असं वाटतं की खरं प्रेम शब्दांत व्यक्त करता येत नाही, तर अशाच शांत आणि अव्यक्त क्षणांत ते सामावलेलं असतं. जिथे शब्दांशिवाय भावना पोहचतात त्यातून जगण्याचा मनभावन आनंद मिळतो आणि जगण्याची उमेद वाढते.
आपल्या सर्वांच्या आयुष्यात अशी एखादी तरी व्यक्ती आलेली असते की त्या व्यक्तीच्या रोज येण्या-जाण्याची, त्या व्यक्तीच्या सुंदर मनमोहक अदांची, त्या व्यक्तीचे स्मितहास्य, त्या व्यक्तीचे क्षणिक हळूच पाहणारे बोलके डोळे बघून आपल्या मनाला मनभावन आनंद मिळून जातो आणि आपण त्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो. त्या सगळ्याची सवय आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतो. *अशा आशयाची पण त्या प्रेमाच्या मौन भाषेचा खूप सखोल अर्थ सांगून जाणारी ही विगसा सरांची कविता.*
ही कविता मनाला खूप शांतता आणि समाधान देऊन जाणारी आहे. यात व्यक्त केलेल्या भावना अतिशय नितळ आणि सुंदर आहेत. कवितेत व्यक्त झालेला प्रेमळपणा वाचकांना कविता वाचताना स्पष्टपणे जाणवतो.”खरोखरच! कधीकधी शब्द जे काही बोलून दाखवू शकत नाहीत त्यापेक्षा जास्त भावना डोळे आणि एक स्मितहास्य बोलून जाते. प्रेमाची खरी भाषा ही अशीच अव्यक्त पण मनाला थेट भिडणारी असते.” या अबोल, मौनी भाषेचा अर्थ ज्याला समजला तोच खरा भाग्यवान असतो.
या कवितेत प्रेमातील एका विशिष्ट आणि अत्यंत हळव्या क्षणाचे वर्णन केले गेले आहे. ही कविता मनाला स्पर्शून जाणारी आहे. कारण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असे भावनिक, मनाला स्पर्शून जाणारे क्षण आलेले असतात. यात व्यक्त झालेली भावना ही उत्कट आहे, ज्यात कुणीतरी अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या भेटीची आणि संवादाची तीव्र इच्छा व्यक्त केली आहे. मनाला आनंद देणाऱ्या या गोड व्यक्तीचा संवाद ऐकण्याची आणि तिच्याशी आपल्या मनातील तिच्या प्रति असलेली ओढ सांगावी असे कवीला वाटते. परंतु काही गोष्टी या नशीबावर अवलंबून असतात. काळ हाच त्यावर एकमेवं उपाय असतो. काळ सरसर सरत असतो आणि किमान तरुणपणात नाही तर निदान उतारवयात तरी आपली तिच्याशी गाठ-भेट व्हावी आणि तिने आपल्याशी मनमोकळेपणाने बोलावे व आपण आपल्या मनातील हितगुज तिला सांगावे असे कवीला वाटते या आशयाची ही कविता.
*परंतु इथेच तर खरी मेख आहे.*
*भावकवी असलेल्या विगसा सरांनी* रचलेले हे सुंदर भावनिक गीत आहे. थोडक्यात, ही कविता दोन जीवांना एकत्र आणणाऱ्या आणि त्यांच्यातील संवादाची आणि भेटीची आतुरता दर्शवणाऱ्या मनाच्या अवस्थेचे सुंदर वर्णन करणारी कविता आहे असे आपल्याला वरवर वाटते. *परंतु संतसाहित्याचे अभ्यासक असलेले भावकवी आप्पा ज्यावेळेला एखादी कविता रचतात त्यात निश्चितच काहीतरी गूढ अर्थ असतो.*
वरवर प्रेम कविता वाटणारी ही कविता नुसतीच प्रेम कविता नसून त्यात प्रेमा विषयी निर्माण झालेली इच्छा, त्यातून तिच्या त्या रोज येण्याच्या सवयीने तिला भेटण्याची निर्माण झालेली ओढ, त्यातून तीला आपण भेटावे आपले हितगुज सांगावे अशी निर्माण झालेली आवड, तिला भेटण्याची लागलेली आस, त्याच बरोबर ती न भेटल्यामुळे आलेली विरह भावना आणि भविष्यात ती पुन्हा भेटावी हे पुनर्मिलन या प्रेमातील सूक्ष्म भावनांचे वर्णन केले गेले आहे. बरेच पावसाळे निघून गेल्यानंतर सुद्धा सरते शेवटी ती आपल्याला भेटावी हा झालेला मोह. थोडक्यात ऐन तारुण्यात पदार्पण करण्यापासून ते थेट वार्धक्याच्या काळा पर्यंत ही कविता प्रवास करते. या कवितेतून एक सूक्ष्म असा संदेश आप्पा आजच्या तरुणाईला देऊ पहात आहेत. प्रेमाची इच्छा मनाशी जरूर बाळगा, त्या इच्छे बरोबर आपला विवेक जागृत ठेवा, त्या इच्छेत हट्ट अथवा आसक्ती आणू नका. जी आजच्या तरुण पिढीत आवर्जून पाहायला मिळते. जर आपली इच्छा पूर्ण होत नसेल तर आपल्या इच्छेचे नियमन कधी आणि कसे करावे हा गूढ संदेश ते देतात.
*त्याशिवाय प्रेम हा विषय हाताळताना त्यात अत्यंत खुबीने आप्पांनी त्यात हलकीशी अध्यात्मिक जाणीव ही वाचकांना करून दिली आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास …*
ऐन युद्धाच्या प्रसंगी आपल्याच आप्त-स्वकीयांना रणांगणात आपल्या समोर शस्त्र हाती घेऊन उभं ठाकलेलं पाहून हताश झालेला अर्जुन ज्यावेळी आपलं शस्त्र खाली ठेवतो त्यावेळी भगवान श्रीकृष्ण त्याला गीतारूपी ज्ञान देतात. हे ज्ञान मिळवत असताना अर्जुनाला सुद्धा भगवान श्रीकृष्णांचे विश्वरूप दर्शन पाहण्याचा मोह होतो आणि तो तशी इच्छा व्यक्त करतो. पण तो त्याचा हट्ट नसतो, त्यात कुठलीही जबरदस्ती नसते. तो म्हणतो देवा तू जर मला त्या योग्यतेचा समजत असशील तरच मला तू तुझे विश्वरूप दर्शन दाखव. हा जो इच्छा- इच्छा विवेक आहे ना तो विगसा सरांच्या ‘कधीतरी एकदा बोलनां’ या कवितेत दिसून येतो.
यांनतर लगेचच त्यांना सुचलेली ‘शब्दांच्या ओंजळी’ ही कविता म्हणजे वरील कवितेचा पुढील भागच असल्या सारखे वाटते.
कवीने आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी बऱ्याच प्रकारच्या क्लुप्त्या वापरल्या, अनेक प्रकारचे आर्जवरूपी शब्द वापरले, कधी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, तिच्यावर अनेक कविता लिहिल्या. ती कदाचित त्यांची प्रेयसी असेल, कदाचित त्यांची काव्य प्रतिभा असेल किंवा अत्यंत समाधानी तृप्त भावनेने ईश्वराजवळ केलेले आर्जव. पण तिच्याकडून पाहिजे तसा कोणताच प्रतिसाद त्याला मिळाला नसावा म्हणून शेवटी नाईलाजास्तव हताश होऊन कवी तिला विचारतो अजून किती व असे कोणते शब्द मी वापरू की ज्यामुळे तुला माझ्या प्रेमाची खात्री होईल आणि तू माझ्याशी एकदा तरी बोलशील. कारण प्रेमाची खोली इतकी अथांग असते की प्रेमाचा आलेला अनुभव हा शब्दांच्या पलीकडचा अनुभव असतो आणि ओंजळी ह्या नेहमी रित्या कारण्यासाठीच असतात हेच त्रिवार सत्य.
आजच्या तरुणाईचे युग जरी फास्ट, स्मार्ट, धावपळीचे असले तरी ‘स्लो लिव्हिंग’ हे किती महत्वाचे आहे हे सांगणारी सुदर कल्पना. ‘स्लो लिव्हिंग’ म्हणजे जाणीवपूर्वक जगणं, प्रेत्येक मिळालेल्या क्षणांचा मनभावन आनंद उपभोगणं. आयुष्याचा वेग वाढत असताना मनाचा वेग नियंत्रित करणं.
*थोडक्यात आप्पां सारख्या असामान्य प्रतिभेच्या कवीची रचना ही आजच्या काळातल्या जंक फूड सारखी नसून ती एका मुरलेल्या मुरंब्या सारखी अनन्यसाधारण रेसिपी असते. ती कवितेतून काव्य, भावना, प्रेम, विरह, पुनर्मिलन, अध्यात्म आणि जीवन जगण्याचा संदेश देऊन जाते.*
*©विनय पारखी*
(मुंबई )
