वन्यहत्तीस कोणत्याही प्रकारची इजा होईल, अशा प्रकारचे कृत्य करु नये
सिंधुदुर्गनगरी
सावंतवाडी तालुक्यात वन्यहत्ती ओंकारचा वावर सुरु आहे. हा वन्यहत्ती सातोसे, कास, मडुरा, रोणापाल, ओटवणे, विलवडे, भालावल, तांबोळी, डेगवे, वाफोली, इन्सुली व बांदा गावातील परिसरातील भातशेती तसेच फळबागायती व लोकवस्तीमध्ये वावर सुरु आहे. या वन्यहत्ती ओंकारला मानवी वस्तपासून दूर ठेवण्याकामी तसेच नैसर्गिक अधिवासात ठेवण्याकामी वनकर्मचारी व जलद बचाव कृती दलमार्फत देखरेख ठेवण्यात येत असल्याची माहिती सावंतवाडी वन परिक्षेत्र अधिकारी सु.बा. पाटील यांनी दिली.
सोशल मिडीयावर तेरेखोल नदीपात्रात वन्यहत्ती ओंकारचा वावर असताना फटाके फोडलेबाबत व्हीडीओ 7 नोव्हेंबर रोजी प्रसारीत झालेला आहे. याबाबत या दिवशी डयुटीवर कार्यरत असलेले वनकर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ यांना विचारणा केली असता, दि. 2 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास वन्यहत्ती ओंकार हा इन्सुली येथील भातशेती तसेच केळी बागायतीमधुन नुकसानी केली आहे. तेरेखोल नदीपात्रात पाणी पिण्याकरीता उतरुन पाणी पिऊन पाण्यात डुबकी मारत नदी किनारी आला. याठिकाणी नदी किनारी असलेल्या सुर्यकांत महादेव दळवी, रा. इन्सुली (धुरीवाडी) यांच्या मालकीची सर्वे नंबर 14/ 1 मधील विद्युत मोटरपंपाचा पाईप हा ओंकार हत्ती सोंडेने ओढत असलेचे निर्देशनास आले. त्यामुळे मोटर विद्युत उपकरणासह पाण्यात पडण्याची शक्यता होती. विद्युत प्रवाहामुळे वन्यहत्ती ओंकार याची जिवीत हानी होण्याची शक्यता असल्याने संबंधीत शेतकरी यांनी सांगीतल्यानुसार वन्यहत्तीला विद्युत करंट लागुन कोणत्याही अनुचीत घटना होऊ नये. याकरीता पाण्यात वन्यहत्ती पासुन काही अंतरावर फटाके वाजविण्यात आलेले आहेत. यात वन्यहत्तीला कोणत्याही प्रकारची इजा किंवा शारिरीक हानी होणार नाही, याची दक्षता वनविभागाव्दारे घेण्यात आलेली आहे.
तसचे वन्यहत्ती ओंकारव्दारे कोणतीही जीवीत किंवा वित्त हानी होणार नाही, याकरीता अपवादात्माक परिस्थितीत वनविभागाव्दारे फटाक्यांचा वापर करण्यात येत आहे. वन्यहत्ती ओंकारचा वावर असलेल्या भागात हत्ती पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी करु नये, तसेच वन्यहत्तीस कोणत्याही प्रकारची इजा होईल अशा प्रकारचे कृत्य करु नये, असे आवाहन वनविभागमार्फत करण्यात येते आहे.
