मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात ‘जागतिक औषध पुरवठा सप्ताह’ उत्साहात संपन्न.
चिपळूण,मांडकी-पालवण,
कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने, महाराष्ट्र राज्य फार्मसी परिषद औषध माहिती केंद्राच्या सहकार्याने जागतिक आरोग्य संघटना आणि उपला मॉनिटरिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक औषध पुरवठा सप्ताह (दिनांक ०३ ते ०९ नोव्हेंबर २०२५) उत्साहात साजरा होत आहे. याच सप्ताहाअंतर्गत, “औषधे अधिक सुरक्षित असल्याची माहिती देणे” या संकल्पनेवर आधारित विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते.
या महत्त्वाच्या कार्यक्रमात औषध विज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. ललिता शशिकांत नेमाडे यांनी महाविद्यालयातील उपस्थित विद्यार्थी आणि प्राध्यापकांना मोलाचे मार्गदर्शन केले. डॉ. नेमाडे यांनी त्यांच्या व्याख्यानात औषधांचे विपरीत परिणाम (दुष्परिणाम) झाल्यास त्वरित काय काळजी घ्यावी, ते कसे कळवावेत, तसेच विपरीत परिणाम टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी याबद्दल सखोल माहिती दिली. औषधे घेण्यापूर्वी त्यांची गुणवत्ता कशी तपासावी, लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना औषध देताना अधिक जागरूक कसे राहावे यावर त्यांनी विशेष भर दिला. तसेच, औषधे घेताना वेळेवर मात्रा घेणे, डॉक्टरांनी सांगितलेला पूर्ण उपचारक्रम (कोर्स) करणे अशा अनेक महत्त्वाच्या सवयींबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले, ज्यामुळे औषधांचा जास्तीत जास्त फायदा होतो आणि सुरक्षितता सुनिश्चित होते.
या कार्यक्रमासाठी गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम सर आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे मॅडम, उपप्राचार्य श्री. बाळासाहेब सूर्यवंशी यांची विशेष उपस्थिती होती. याव्यतिरिक्त, दोन्ही महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
