You are currently viewing अखंड भारतासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान

अखंड भारतासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*अखंड भारतासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान*

 

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त ३१ ऑक्टोबर हा एकता दिवस” म्हणून आज संपूर्ण भारत देश कृतज्ञतापूर्वक आणि आदरपूर्वक या थोर नेत्याचे स्मरण करत आहे.

 

एक कुशल संघटक, खंबीर नेता म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल.

 

“भारतातील संस्थानांचे विलीनीकरण” हा स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या भारतीय राजकारणातला एक उल्लेखनीय तसेच गौरवशाली इतिहास आहे.

 

१५ ऑगस्ट १९४७ रोजी संस्थानांना तीन पर्याय देण्यात आले.

१- संस्थानांनी भारतात सामील होणे.

२- संस्थानांनी पाकिस्तानात सामील होणे.

३- किंवा स्वतंत्र राहणे.

यापैकी कोणताही एक पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य त्यांना ब्रिटिश कराराद्वारे दिले गेले होते पण सरदार पटेल आणि व्ही पी मेनन यांच्या नेतृत्वाखाली वाटाघाटी करून, मुत्सद्दीपणाने सर्व ५६५ संस्थानांना भारतीय संघराज्यात विलीन करून घेण्यात आले आणि त्यामुळेच भारताची भौगोलिक अखंडता मजबूत झाली. देशाचे अनेक तुकडे होणे टळले.

 

इंग्रज गेल्यानंतर आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातली संस्थाने स्वतंत्र पद्धतीने राज्यकारभाराचा निर्णय घेणार होते परंतु त्या सर्वांना भारतात विलीन करून आणि भारताचे अखंडत्व कायम ठेवण्याचे महान कार्य सरदार पटेल यांनी अशा पद्धतीने पार पाडले.

 

 

सुमारे ५६५ संस्थानांचे वर्चस्व भारतीय राजकारणात त्यावेळी होते. थोडक्यात ती स्वतंत्र राज्येच होती.परंतु त्या सर्व संस्थानांना अत्यंत कौशल्याने, दृढनिश्चय आणि कठोर परिश्रमाच्या बळावर एकत्र आणण्याचे महान कार्य सरदार पटेल यांच्या हातून घडले आणि आजचा अखंड भारत साकार झाला. त्यांच्या या कार्यामुळेच संस्थानातील नागरिकांना समान दर्जा मिळाला आणि देशाचा विकासाचा मार्ग मोकळा झाला.

 

यादरम्यान काही संस्थानांनी विलीन होण्यास नकार दिला होता. अशावेळी स.पटेल यांना कठोर धोरणांचा आणि राजकीय कौशल्याचा अवलंब करावा लागला आणि या त्यांच्या सांघिक चतुराईचे फलित म्हणजे संस्थानांचे राज्यकर्ते एकत्र येण्यास आणि “एक भारत एक राष्ट्र” मानण्यास, स्थापण्यास राजी झाले.

 

काही ठिकाणी मात्र वैचारिक वाटाघाटी अयशस्वी ठरल्या. त्यावेळी मात्र त्यांनी सशस्त्र बळाचा वापर करण्यास अजिबात मागे पुढे पाहिले नाही. हैदराबादचा निजाम हे त्याबाबतीतले एक ठळक उदाहरण. भारतीय सैन्याच्या कारवाईमुळे अखेर निजामाला आत्मसमर्पण करावे लागले.

 

भारत देश हा सुरुवातीपासूनच लोकशाही तत्त्व पाळणारा आहे. स्वतंत्र भारताची संपूर्ण बैठक ही लोकशाहीचाच पुरस्कार करणारी आहे. स. पटेल यांच्या प्रयत्नामुळे संस्थानांचे विलीनीकरण झाल्यामुळे, लोकशाही आणि विकासाचा भक्कम पाया सुरुवातीपासून रचला गेला. अखंड भारत हे शेकडो वर्षांचे देशाचे स्वप्न त्यामुळे साकार झाले. हे अनमोल कार्य करण्यासाठी दूरदूरच्या भागात आणि सीमावर्ती भागात जातीने प्रवास करून संस्थानांच्या राज्यकर्त्यांमध्ये एकजूट निर्माण करण्याच्या आणि पर्यायाने एकात्म राष्ट्र उभारण्याच्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नांना यश प्राप्त झाले आणि याच त्यांच्या कार्यासाठी त्यांना भारताचे *लोहपुरुष* म्हणून ओळखले जाते.

 

स्वातंत्र्याची चळवळ आणि भारतीय राजकारण या बाबतीत सरदार पटेल यांचा एक महत्त्वाचा व्हिजन होता. त्यांनी फक्त भारतातील एकतेचेच स्वप्न पाहिले आणि ते रुजवले. देशाच्या प्रगतीसाठी, स्थैर्यासाठी, सामर्थ्यासाठी एकात्म आणि एकात्मिक भारत किती महत्त्वाचा आहे हे त्यांनी जनमानसावर सातत्याने ठसवले. भारतीय स्वावलंबन आणि आत्मविश्वास वाढवण्याच्या गरजेवर त्यांनी नेहमीच भर दिला. परंतु तरीही गांधींप्रमाणे हिंदू मुस्लिम ऐक्य एवढीच स्वातंत्र्यासाठी आवश्यक असलेली पूर्वअट त्यांनी तेव्हा मानली नाही. त्यांच्या कल्पनेतला, “एकतेचा, एकजुटीचा भारत” हा अधिक व्यापक विचार होता. तसेच जबरदस्तीने आर्थिक आणि सामाजिक बदल घडवून आणण्याच्या गरजेवरही स.पटेल पंडित नेहरू यांच्याशी असहमत होते. अखंड भारताचे स्वप्न पाहताना त्यांनी पारंपरिक हिंदू मूल्ये रुजलेला रुढीवाद महत्त्वाचा मानला. भारतीय सामाजिक आणि आर्थिक रचनेशी समाजवादी विचारांची उपयुक्तता न मानता त्यांनी रुढीवादी घटकांचा विश्वास मिळवला. “एकात्म भारत” कल्पनेतली ही एक उल्लेखनीय विचारधारा सरदार पटेल यांची होती.

 

१९१५ मधील खेडा येथील आणि १९२८ मधील बारडोली येथील महसूल आणि करांविरुद्ध शेतकर्‍यांसाठी आखलेल्या मोहिमांचे सरदार पटेल यांनी अत्यंत कौशल्याने आणि लढाऊ वृत्तीने नेतृत्व केले व त्यात यशही मिळवले. बारडोली येथील शेतकरी महिलांनी त्यांना “सरदार” ही पदवी अर्पण केली. सरदार म्हणजे नेता, राजा. ज्याने कष्टकरी वर्गाला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणून राष्ट्रीय एकात्मतेची एक उजळ दिशा दाखवली आणि शेतकरी आणि जमीनदार यांच्यातील विषमतेची दरी दूर करण्याचा प्रयत्न केला.

 

एक राष्ट्रवादी नेता म्हणून त्यांना सारे ओळखू लागले. ब्रिटिशांसाठी ते एक धोकादायक शत्रू असतील पण भारताचे अखंडत्त्व जपणारे ते एक अत्यंत व्यावहारिक आणि निर्णयाक नेते होते.

 

३१ ऑक्टोबर १८७५ साली नडियाद येथे जन्मलेल्या या भारतीय सुपुत्राने आयुष्यभर राष्ट्रीय एकात्मतेची ज्योत तेवत ठेवली. स्वातंत्त्र्य प्राप्तीनंतर त्यांनी गृहमंत्री, उपपंतप्रधान, राज्यमंत्री अशी महत्त्वाची पदे भूषविली. स्वावलंबीत्व आणि एकजूट याच तत्वांचा त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत पाठपुरावा केला. १५ डिसेंबर १९५० साली मुंबई येथे या महान देशभक्ताची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूनंतर जवळजवळ ४१ वर्षांनी म्हणजे १९९१साली त्यांना भारत सरकारने “भारतरत्न” हा किताब बहाल केला, भारताच्या नागरी सेवकांचे “संरक्षक संत” म्हणून देखील त्यांना आज ओळखण्यात येते. या लोहपुरुषाच्या स्मरणार्थ गुजरात मध्ये नर्मदा नदी किनारी “स्टॅच्यू ऑफ युनिटी” हा सर्वात उंच पुतळा उभारण्यात आलेला आहे. त्यांच्या या पुतळ्याला “स्टॅच्यू ऑफ युनिटी” असे संबोधण्यामागे सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेल्या राष्ट्रीय एकात्मतेच्या भूमिकेचे स्मरण आहे. या सर्व कृत्यांमधून, विधींमधून भारताची अखंडता जपणाऱ्या या लोहपुरुषास व्यक्त केलेली कृतज्ञतापूर्वक आदरांजली आहे.

 

“राष्ट्रीय एकता दिनाच्या” (३१अक्टोबर)आयोजनातून सरदार पटेल यांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाचा हा सन्मान आणि स्मरण आहे आणि हीच कामना आहे की आपल्या आजच्या विखुरलेल्या समाजात पुन:श्च एकतेचे बंधन अधिकाधिक दृढ होत जावो!

 

धन्यवाद!

 

*राधिका भांडारकर* *पुणे*.

प्रतिक्रिया व्यक्त करा