*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*क्षण सुखाचे आनंदाचे…*
खरं तर.. आनंदाचे क्षण, जीवनात शेकड्यांनी
असतात म्हटले तरी चालेल, फक्त त्याकडे
तशी बघण्याची दृष्टी हवी म्हणजे आनंद शोधावा
लागत नाही.
विनोबाजी म्हणतात,” तुम्ही आनंद स्वरूप आहात”. आनंद बाहेर शोधण्याची गरजच नाही.
तो तुमच्या हृदयात असूनही तुम्ही दु:ख्खाच्या
शोधात असता. माणसाला नसलेले दु:ख्ख शोधायची सवय आहे. हा माणसाचा स्वभाव आहे? खरे सांगा, कुणाची प्रगती होत असेल तर
आपण दु:ख्खी का व्हावे? त्याच्या आनंदात आपल्याला सामील होता यायला हवे ना? नाही,
त्यालाच का? मला का नाही? हा प्रश्न आपल्याला भेडसावतो व आपण दु:ख्खी होतो.
आहे की नाही माणसाला दु;ख्ख शोधायची सवय?…
त्यामुळे आनंदाचे असे शेकडो क्षण आपण गमावतो व विनाकारण दु:ख्ख कवटाळत बसून
सुखाला पारखे होतो. त्यामुळे शेकडो लाखो सुखाचे क्षण जीवनात असतांनाही एक प्रकारची
अतृप्ती, कमतरता, ती जीवनात नसतांनाही आपल्याला भेडसावत राहते व माणूस स्वस्थ न
राहता अस्वस्थ राहतो व ही अस्वस्थता, अतृप्ती
सतत त्याला वाम मार्गाकडे नेत त्याचे नैतिक अंध:पतन होण्याला कारणीभूत ठरते. तो उत्तरोत्तर घसरत जातो हे त्याच्या स्वार्थी वृत्तीमुळे
त्याच्या लक्षातही येत नाही व तो हे सारे समजून
घेण्याच्या पलीकडे जाऊन पालथ्या घड्यावर पाणी पडते.अशा माणसांना समजाऊन शिकवून
उपयोग नसतो कारण ते आपले तेच बरोबर याच
भ्रमात कायम असतात.
म्हणजे बघा, सुख काखेत आहे हो.. हातभर अंतरावरही नाही तरी ते आपल्याला गवसत नाही
कारण डोळ्यावर बांधलेली स्वार्थाची पट्टी! जशी
दुर्योधनाच्या डोळ्यांवर होती. सर्वनाश समोर दिसत असून त्याचा विनाश होईपर्यंत त्याचे डोळे
उघडलेच नाहीत. माणसाने इतकेही अंध असू नये हो! म्हणजे डोळे असूनही!. विधी लिखित ..
दुसरे काय?..
माझे म्हणाल तर.. मी सदैव सकारात्मक विचार
करणारी आहे. अमुक गोष्ट होणार नाही असे मला कधीच वाटत नाही. म्हणून माझ्या जीवनात
दु:ख्खाचे प्रसंग आलेच नाहीत असे कसे होईल?
अहो, दु:ख्ख देवादिकांनाही चुकले नाही तिथे आपण कोण? प्रसंग आले पण मी त्यावर मात करत गेले. धरून बसले नाही व कांगावाही केला नाही नि वाच्यताही केली नाही. शेवटी सोसणार
आपणच ना? मग त्याचा गाजावाजा कशाला?
आणि ते क्षण काही कायम बसून रहात नाहीत.
पाठीमागून सुख येतेच ना? जीवन हे आनंदाने जगण्यासाठी बहाल केलेली देवाने दिलेली मोठी
देणगी आहे असे मी मानते नि नसत्या भ्रमात व
जे हाती लागत नाही त्याचे दु:ख्ख न करता मला
देवाने जे बहाल केले ते सारेच पुरेसे व सुंदर आहे
असे मी मानते नि महालाकडे न बघता सतत
झोपड्यांकडे बघते व म्हणते, देवा! तू मला खूप
दिलेस रे! बस्स.. मी समाधानी आहे. मी सुमती पवारच राहू दे. मला कुसुमाग्रज व्हायची अभिलाषा नाही.
मला आईपण मिळाले.. या पेक्षा दुसरा आनंदाचा
क्षण कोणता? हो, त्यानंतर मी स्वत:लाच विसरले
व फक्त मुलांसाठीच जगले ते आजतागायत.
मी खडतर तपश्चर्या करून शिक्षण पूर्ण केले, ते
ही संसारात पडल्यानंतर.. व त्याला नोकरीचे पर्यायाने अर्थार्जनाचे सुंदर फळ आले जे मला अत्यंत निकडीचे होते.
माझी दोन्ही मुले अत्युच्य शिक्षण घेऊन अत्युच्य
पदी स्थिरावली आहेत ही देवाची केवढी मोठी कृपा आहे माझ्यावर!
दोघांचे विवाह होऊन आज माझी नातवंडे डॅा. व
IIT होत आहेत, या पेक्षा आनंदाचे क्षण कोणते?
हे सारे कष्टाचे फळ असले तरी” त्याचे” आशीर्वाद व पाठबळ लागतेच ना? ते आज माझ्या जवळ आहे. हे आणि असे कितीतरी प्रसंग
जसे, आज माझी भिंतीवरील भलीमोठी शोकेस सन्मान चिन्हांनी खचाखच भरली आहे असे कितीतरी प्रसंग सांगता येतील. आनंद मानता आला पाहिजे, समाधान शोधता आले पाहिजे नाहीतर मग.. “ दु:ख्खाला अंत नाही” लक्षात
ठेवा. आपणही आनंदी रहा, इतरांनाही ठेवा. कमीतकमी दु:ख्ख तरी वाटू नका. कोणत्याही
भ्रमात जगू नका म्हणजे मग निखळ आनंद सापडेलच सापडेल.
…. ॥धन्यवाद॥
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

