वेंगुर्ले नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून विलास गावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब
जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांची घोषणा; चार नगरसेवक उमेदवारांचीही नावे जाहीर
वेंगुर्ले
वेंगुर्ले नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून विलास गावडे यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. प्रदेश काँग्रेसकडून यासाठी हिरवा कंदील मिळाल्याची माहिती जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिली.
साई मंगल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. शेख यांनी नगराध्यक्ष उमेदवारासह चार नगरसेवक पदांच्या उमेदवारांची नावे जाहीर केली. जाहीर झालेल्या उमेदवारांमध्ये —
प्रभाग २ ब: माजी नगरसेवक विधाता सावंत
प्रभाग ५ ब: चेतन कुबल
प्रभाग ६ ब: महेश उर्फ प्रकाश डिचोलकर
प्रभाग ८ ब: सतेज मयेकर
यांचा समावेश आहे.
प्रदेश काँग्रेसकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीबाबत कोणताही निर्णय झालेला नसला तरी, स्थानिक पातळीवर परिस्थितीनुसार मैत्रीपूर्ण लढतींचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले असल्याचे शेख यांनी सांगितले.
“वेंगुर्लेचा सर्वांगीण विकास आणि सुशासन हा आमचा मुख्य उद्देश असून, जिंकण्यासाठी नव्हे तर वेंगुर्लेच्या प्रगतीसाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत,” असे मत श्री. शेख यांनी व्यक्त केले.
यावेळी विलास गावडे, तालुकाध्यक्ष विधाता सावंत, आत्माराम (दादा) सोकटे, सतेज मयेकर, चेतन कुबल, तसेच अब्दुल शेख, अंकुश मलबारी, समीर नागवेकर, सुमित डगरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शेख यांनी पुढे सांगितले की, उर्वरित प्रभागांमधील उमेदवारांची नावे टप्प्याटप्प्याने जाहीर केली जातील.
