You are currently viewing बंगळुरूमध्ये राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत प्रज्योती जाधवला कास्यपदक

बंगळुरूमध्ये राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत प्रज्योती जाधवला कास्यपदक

कनेडीच्या प्रज्योतीचा राष्ट्रीय स्तरावर चमकदार खेळ; जम्मू-काश्मीर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड

कणकवली :

बंगळुरू येथे झालेल्या राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत येथील प्रज्योती श्रीकांत जाधव हिने कास्यपदक पटकावले आहे.

३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बंगळुरू येथे पार पडलेल्या ४२व्या राष्ट्रीय ज्युनिअर क्योरेगी व १५व्या पुमसे तायक्वांदो स्पर्धेत प्रज्योतीने ५९ ते ६३ किलो वजनी गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत हे यश मिळवले.

प्रज्योतीने यापूर्वी शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले असून, तिची आता जम्मू-काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ती सध्या माध्यमिक विद्यामंदिर, कनेडी येथे इयत्ता बारावी (सायन्स) मध्ये शिक्षण घेत आहे.

प्रज्योती नगर वाचनालय येथील मास्टर स्पोर्ट तायक्वांदो अकॅडमीमध्ये राष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक व पंच एकनाथ धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.

तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शिवछत्रपती पुरस्कार विजेते, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व पंच प्रवीण बोरसे, तसेच भालचंद्र कुलकर्णी, सुधीर राणे, विनायक सापळे, अमित जोशी, आणि क्रीडा शिक्षक महासंघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष बयाजी बुराण यांनी प्रज्योतीचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा