You are currently viewing सावंतवाडी नगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत रणकंदन.

सावंतवाडी नगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत रणकंदन.

संपादकीय……

बापूसाहेब महाराजांची पुण्याई लाभलेलं सावंतवाडी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील स्वच्छ सुंदर आणि शांत शहर. राजाश्रय लाभलेलं ऐतिहासिक शहर आपल्या संस्कृतीसाठी अवघ्या महाराष्ट्रात ओळखले जाते. चंद्रकांत वाडकरांपासून ते बबन साळगावकर यांच्यापर्यंत अनेक दिग्गज नेते शहरास लाभले होते. परंतु सावंतवाडी नगरपालिकेच्या सभागृहात स्थायी समितीच्या सभेत वादावादी, भांडणे अथवा एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार कधी घडले नव्हते.
नगरपालिकेच्या सभांमध्ये काही विषयांवर विरोधी मते येतात, त्यातून विरोध प्रतिरोध होतो परंतु तो नियमानुसार. कोणीही ठराव घेण्यावरून अथवा विरोध करण्यावरून हमरीतुमरीवर येत नाहीत. लोकमान्य टिळकांचे नाव दिलेल्या या सभागृहात अशाप्रकारे मारामारी पर्यंत वादावादी होणे हे सावंतवाडी शहराच्या संस्कृतीमध्ये लांच्छनास्पद आहे. सुसंस्कृत शहरात सुशिक्षित आणि सुसंस्कृत प्रतिनिधी म्हणून शहरवासीयांनी आपल्या भागातून लोकप्रतिनिधी निवडून दिले आहेत. परंतु पालिकेच्या सभागृहात एखादा क्षुल्लक ठराव घेणे न घेणे सारख्या विषयांवरुन जर ते एकमेकांच्या अंगावर धावून जात असतील तर शहरवासीय अशा लोकप्रतिनिधींकडे आपला विषय घेऊन गेल्यास ते जनतेची काय सेवा करणार? लोकांचे, नगरीचे सेवक म्हणजे नगरसेवक. परंतु जर अशाप्रकारे एकमेकांना भर सभागृहात किंमत दिली जात नसेल, सभागृहाची मर्यादा शिस्त पाळली जात नसेल तर अशा बेजबाबदार नगरसेवकांना लोकांचे प्रतिनिधित्व करण्याचा हक्क आहे का?
सावंतवाडी नगरपालिका सभागृहात माजवलेल्या रणकंदनामुळे सावंतवाडी शहराची शोभा वाढविण्यापेक्षा संपूर्ण जिल्ह्यात, राज्यात आपल्याच शहराचे प्रतिनिधित्व करणारेच शहराची शोभा करत आहेत त्यामुळे समस्त सावंतवाडीवासीयांना शरमेने मान खाली घालावी लागत आहे. शहरासाठी, जनतेसाठी काही करा न करा परंतु शहराची आजपर्यंत टिकून राहिलेली शिस्त आणि संस्कृती बिघडवून सावंतवाडीची लाज मात्र घालवू नका. अशी आर्त हाक आज सावंतवाडीवासीय देत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा