शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांची पत्रकार परिषदेत घोषणा; दीपक केसरकर यांच्या विकासकामांचा उल्लेख; विरोधकांना अप्रत्यक्ष टोला
सावंतवाडी :
आगामी काळात होणाऱ्या सावंतवाडीसह वेंगुर्ले, दोडामार्ग नगरपरिषद निवडणुका आम्ही स्वबळावरच लढणार, आमची तयारी झालेली आहे. आम्हाला कोणासोबत युती नकोच, अशी स्पष्ट भूमिका आज आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी मांडली.
दरम्यान आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा मराठी-मालवणी बोलणारा आणि सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणारा असेल, असे ते म्हणाले. रात्री साडेदहा नंतर सर्वसामान्य लोकांना भेटणार आहोत आणि सर्वसामान्य घरातील व्यक्तीचे नाव उमेदवार म्हणून लवकरच जाहीर करू, असे त्यांनी सांगितले.
संजू परब म्हणाले, “या ठिकाणी सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग नगरपालिकांमध्ये आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला युतीची गरज नाही. आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणारा असून तो मराठी-मालवणी भाषेत संवाद साधणारा असेल.”
यावेळी त्यांनी सांगितले की, आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून १६ कोटी रुपयांचा निधी सावंतवाडी शहराला प्राप्त झाला आहे. यात मटन मार्केट, योगा सेंटर, म्युझियम, रस्ते, गटार, फुटपाथ आदी अनेक विकासकामांचा समावेश आहे. त्यामुळे तीन कोटी रुपये आणल्याचे सांगणारे लोक चुकीची माहिती देत आहेत, असा टोला त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना नाव न घेता लगावला.
परब यांनी सांगितले, “मनोज नाईक माझे जिवलग मित्र आहेत, त्यामुळे त्यांचा विरोध आम्हाला नाही. संगीत कारंजाचे काम चांगल्या पद्धतीने पूर्ण झाले असून, जे काही गैरसमज निर्माण झाले होते ते दूर करण्यात आले आहेत.”
या पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष बाबू कुडतरकर, महिला जिल्हाध्यक्षा नीता कविटकर, प्रेमानंद देसाई, अजय गोंदावळे, परीक्षित मांजरेकर यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
