अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील १७ हजारहून अधिक शेतकऱ्यांचे नुकसान…
४ हजार ३३८ हेक्टर क्षेत्र बाधित; भरपाईसाठी युद्ध पातळीवर पंचनामे सुरू…
सिंधुदुर्गनगरी
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल ४ हजार ३३८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे ५२५ गावातील तब्बल १७ हजार १७२ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यात भात पिकासह नाचणीचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी दिली.
दरम्यान या नुकसानीचा पंचनामा युद्धपातीवर सुरू असून तशा प्रकारचे आदेश कृषी अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी यांना देण्यात आले आहेत. लवकरात-लवकर संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत, असे त्यांनी सांगितले. याबाबत जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. ज्या शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असल्यास त्यांनी संबंधित ग्रामस्तरीय क्षेत्रीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्रीमती नाईकनवरे यांनी केले आहे.
