You are currently viewing कुंभारमाठ-गोवेकरवाडी मार्गावरील जुन्या चिरेखाणीतील पाण्यात पाच जण बुडाले

कुंभारमाठ-गोवेकरवाडी मार्गावरील जुन्या चिरेखाणीतील पाण्यात पाच जण बुडाले

कुंभारमाठ-गोवेकरवाडी मार्गावरील जुन्या चिरेखाणीतील पाण्यात पाच जण बुडाले

करिश्मा पाटील (१६) हिचा दुर्दैवी मृत्यू : राहुल भिसेने चार जणांना वाचविले

मालवण

कुंभारमाठ-गोवेकरवाडी मार्गावरील जुन्या चिरेखाणीतील साचलेल्या पाण्यात आंघोळीसाठी उतरलेल्या पाच जणांचा सोमवारी सायंकाळी बुडण्याचा प्रकार घडला. या घटनेत करिश्मा सुनील पाटील (वय १६) हिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून चार जणांना स्थानिक तरुणाच्या धाडसाने वाचवण्यात यश आले आहे.

कुंभारमाठ गोवेकरवाडी येथील लोंढे यांच्या घरी मुंबई-विरारहून आलेले अंजली प्रकाश गुरव (३०), गौरी गुरव (१८), गौरव गुरव (२१), करिश्मा पाटील (१६) आणि दुर्वेश पाटील (९) हे पाच जण सायंकाळी चिरेखाणीच्या पाण्यात आंघोळीसाठी उतरले होते. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते सर्वजण बुडू लागले.

या घटनेदरम्यान रस्त्यावरून जात असलेल्या राहुल भिसे या तरुणाने आरडाओरड ऐकताच क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेतली आणि एका महिलेसह तीन मुलांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र, करिश्मा पाटील ही मुलगी पाण्याच्या खोल भागात गेल्याने ती बेपत्ता झाली.

घटनेची माहिती ग्रामस्थांनी डॉ. राहुल राजूरकर यांना दिली. त्यांनी तात्काळ अजित स्कुबा डायव्हिंग व रेहान स्कुबा डायव्हिंग पथकाला कळवले. अन्वेशा आचरेकर यांच्या माध्यमातून पथक घटनास्थळी दाखल झाले. योगेश पांचाळ आणि आजीम मुजावर यांनी शोधमोहीम राबवत शेवटी करिश्मा पाटील हिचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

बुडालेल्या व्यक्तींमध्ये गंभीर अवस्थेत असलेल्या अंजली गुरव हिला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर तिला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. अन्य तिघेही सुखरूप असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक एस. एस. खाडे, जितेंद्र पेडणेकर, अनुप हिंदळेकर, तसेच महिला पोलीस सुप्रिया पवार घटनास्थळी दाखल झाले. पोलीस पाटील विठ्ठल बावकर, दशरथ गोवेकर, सरपंच पूनम वाटेगावकर यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत पोलीस तपास आणि पुढील कार्यवाही सुरू होती.

करिश्मा पाटील हिच्या निधनाने गोवेकरवाडी परिसरात शोककळा पसरली. ग्रामस्थ आणि उपस्थितांनी या दुर्दैवी घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा