आफताब शेख प्रकरणात अखेर तोडगा —
सात दिवसांनंतर मृतदेह नातेवाईकांकडे
सावंतवाडी
बांदा येथील फुल व्यवसायिक आफताब कमरूद्दीन शेख (वय ३८) यांच्या आत्महत्येनंतर तब्बल सात दिवसांनी अखेर त्यांच्या मृतदेहावर तोडगा निघाला असून, उद्या तो नातेवाईकांकडे सुपूर्द केला जाणार आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंत्यसंस्कार बांदा स्मशानभूमीत होणार आहेत.
आफताब शेख यांनी फुलांच्या व्यवसायात अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप करत आत्महत्या केली होती. या घटनेनंतर नातेवाईकांनी पाच व्यक्तींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता आणि कारवाई न झाल्याने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता.
मृतदेह सहा दिवस सावंतवाडी व जिल्हा रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आला होता. अखेर काल उशिरा संबंधित पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्याची तयारी दर्शविली आहे.
उद्या सकाळी आफताब यांचा मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द केला जाईल आणि त्यानंतर अंत्यसंस्कार पार पाडले जातील, अशी माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली.
