पंढरपूरच्या पांडुरंगाच्या लाकडी रथनिर्मितीचे काम अंतिम टप्प्यात
– कोकणातील कारागिरांचा अभिमान!
श्री क्षेत्र विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पंढरपूर येथे पांडुरंगाच्या लाकडी सागवानी रथनिर्मितीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या पवित्र कार्याचे सौभाग्य कोकणातील सुपुत्रांना लाभले आहे.
हे काम श्री केळबाई इंडस्ट्रीज, कुडाळ चे मालक श्री. सिद्धेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ आणि नेरूर गावचे कुशल कारागीर श्री. विलास मेस्त्री काका, तसेच त्यांचे मित्र श्री. श्यामसुंदर मेस्त्री आणि त्यांचे सहकारी यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन रथनिर्मितीचे काम जवळजवळ पूर्णत्वास नेले आहे.
या कार्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना श्री. सिद्धेश नाईक म्हणाले की, “पंढरपूर देवस्थानाच्या या पवित्र कार्यात सहभागी होण्याचा मान आम्हा कोकणवासीयांना मिळाला, ही आमच्यासाठी परम भाग्याची गोष्ट आहे.”
पंढरपूरातील भक्तजन आणि स्थानिक प्रशासनाकडून या रथाच्या उद्घाटनाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. हा रथ आगामी आषाढी वारीत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

