पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली शहरासाठी साडेदहा कोटींचा विकासनिधी मंजूर — समीर नलावडे
कणकवली :
माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून कणकवली शहरासाठी तब्बल दहा कोटी ६५ लाख रुपयांचा विकासनिधी मंजूर झाला आहे. या निधीतून शहरातील ३६ विकासकामांना मंजुरी मिळाली असून, पावसाळ्यानंतर या कामांना प्रारंभ होणार आहे, अशी माहिती कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
येथील भाजप संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. नलावडे आणि माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे बोलत होते. यावेळी भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगरसेवक बंडू गांगण आदी मान्यवर उपस्थित होते.
नलावडे म्हणाले, “पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारामुळे कणकवली शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली आहे. शहराच्या प्रत्येक वॉर्डात आवश्यक सुविधा निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पावसाळ्यानंतर मंजूर सर्व विकासकामांना सुरुवात केली जाईल.”
दरम्यान, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी मंजूर झालेल्या विकासकामांचा तपशील सादर केला. त्यात टेंबवाडी-रवळनाथ मंदिर-सुतारवाडी रस्ता, निम्मेवाडी बाईतघर रस्ता डांबरीकरण, नरडवे रोडवरील संरक्षक भिंत, सोलार पथदिवे, गटर बांधकाम, फुटपाथ बांधकाम, रिंगरोडवरील सोलार व्यवस्था, परबवाडी, तेलीआळी, मराठा मंडळ व बाजारपेठ परिसरातील रस्ते आणि गटार दुरुस्ती, स्मशानभूमीचे नुतनीकरण, माऊली नदी परिसर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण अशी अनेक कामे समाविष्ट आहेत.
या निधीमुळे कणकवली शहराचे स्वरूप बदलणार असून नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळतील, असा विश्वास हर्णे यांनी व्यक्त केला.
याच पत्रकार परिषदेत पुढे बोलताना समीर नलावडे म्हणाले, “आगामी कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजप पक्ष महायुतीच्या माध्यमातून लढणार की स्वबळावर, याबाबत अद्याप कोणतेही संकेत आमच्या पक्षाने दिलेले नाहीत. मात्र आमचे नेते आणि पालकमंत्री नीतेश राणे तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये होणारा निर्णय आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल. ‘आम्ही विरुद्ध सर्वजण’ हा कणकवली शहराचा राजकीय इतिहास असून या निवडणुकीत आमची टीम पूर्ण तयारीत आहे.”
