निगुडेत भरवस्तीत धाडसी घरफोडी; साडेचार लाखांचा ऐवज लंपास – पोलिसांचा तपास सुरू
निगुडे (ता. बांदा) –
पाटीलवाडी येथे मंगळवारी दुपारी सिराउद्दीन इब्राहिम हेरेकर यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील लॉकरमधून ५९ ग्रॅम सोने, चांदी आणि सुमारे २ लाख रुपयांची रोकड असा एकूण ४ लाख ७६ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.
घटनेच्या वेळी हेरेकर कुटुंबातील सदस्य सावंतवाडी येथे डॉक्टरकडे गेले होते. दरम्यान, चोरट्यांनी भरवस्तीत दिवसाढवळ्या घरफोडी केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या नेतृत्वाखाली बांदा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. श्वानपथक आणि ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. स्थानिकांच्या माहितीनुसार, दोन दुचाकीवरून काही तरुणांना त्या परिसरात पाहण्यात आले होते. शेती परिसरातून चिखलाच्या खुणा मिळाल्याने चोरटे दुचाकीवरून पळाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
निगुडे येथील माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला. खामदेव चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याने तपासात अडचण निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक माहिती असलेल्या व्यक्तींकडून ही चोरी झाली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून तपास सुरू आहे.
